मुंबई : गोरेगाव येथील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील घोटाळा प्रकरणातील आरोपनिश्चिती पुन्हा लांबणीवर पडली. गुरुवारी विशेष पीएमएलए न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत गैरहजर राहिल्याने विशेष न्यायालयाने आरोपनिश्चितीची सुनावणी १६ फेब्रुवारीपर्यंत तहकूब ठेवली. त्यामुळे या प्रकरणात आरोपी असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
कोट्यवधी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी सध्या विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यापुढे सुनावणी सुरू आहे. या प्रकरणात मागील सुनावणीवेळी आरोपनिश्चिती केली जाणार होती. गुरुवारी सुनावणीच्यावेळी आरोपी प्रवीण राऊत न्यायालयात होते. तसेच अन्य दोन आरोपी गुरुआशिष कंपनीचे प्रवर्तक राकेश आणि सारंग वाधवान यांना व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे हजर करण्यात आले. तर खासदार संजय राऊत गैरहजर राहिल्याने न्यायालयाने सुनावणी १६ फेब्रुवारीपर्यंत तहकूब ठेवली. त्या दिवशी आरोप निश्चित होण्याची शक्यता आहे.