युटीएस अँपद्वारे प्रथम श्रेणी, एसी लोकलचे एकावेळी जास्त तिकिटे मिळण्याबाबत उदासीनता

मागील अनेक महिन्यांपासून युटीएस अँपमधील अनेक त्रुटींबाबत प्रवाशांकडून तक्रारी करण्यात येत आहेत. यामधील काही त्रुटी रेल्वे प्रशासनाने दूर केल्या...
युटीएस अँपद्वारे प्रथम श्रेणी, एसी लोकलचे एकावेळी जास्त तिकिटे मिळण्याबाबत उदासीनता

रेल्वे प्रवासादरम्यान रांगेत उभे न राहता झटकन तिकीट काढता यावे युटीएस अँप प्रवाशांच्या सेवेत आणण्यात आले. याला उदंड प्रतिसाद मिळत असून लाखो प्रवासी या अँपचे वापरकर्ते आहेत. अलीकडेच हे ॲप अद्ययावत केल्याने रेल्वे स्थानकाच्या पाच किलोमीटर परिसरातून लोकल तिकीट घेणे शक्य झाले आहे. मात्र अद्याप प्रथम श्रेणी आणि वातानुकूलित लोकलसाठी एकावेळी अनेक तिकिटे घेण्याची सुविधा मिळालेली नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. प्रथम श्रेणी आणि एसी लोकलचे तिकीट घेण्यासाठी एक तिकीट काढल्यानंतर अन्य तिकीट काढण्यासाठी दहा मिनिटांची वाट पाहावी लागत असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत.

मागील अनेक महिन्यांपासून युटीएस अँपमधील अनेक त्रुटींबाबत प्रवाशांकडून तक्रारी करण्यात येत आहेत. यामधील काही त्रुटी रेल्वे प्रशासनाने दूर केल्या असून प्रथम श्रेणी आणि एसी लोकलचे एकावेळी एकापेक्षा जास्त तिकिटे उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना एकापेक्षा जास्त तिकिटे हवी असल्यास रेल्वे स्थानकातील तिकीट खिडक्यांवरील रांगेत उभे राहावे लागत आहे. अँपमध्ये आवश्यक ते बदल करण्याच्या तसेच अँप अद्ययावत करण्याच्या सूचना मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) रजनीश कुमार गोयल यांनी काही दिवसांपूर्वी प्रशासनाला दिल्या आहेत. तर याबाबत क्रिस, रेल्वे मंडळाला प्रस्ताव देखील पाठवण्यात आला. मात्र अद्यावतीकरणानंतर केवळ अंतराची मर्यादा शिथिल करण्यात आलेली आहे. प्रवाशांचा अनेक तिकिटे घेण्यासाठी रांगेचा त्रास कायम आहे. दरम्यान, द्वितीय श्रेणीची एकावेळी अनेक तिकिटे घेण्याची मुभा प्रवाशांना आहे. परंतु प्रथम श्रेणी आणि वातानुकूलित लोकलची एकाच वेळी अनेक तिकिटे घेण्याबाबत आजही उदासीनता आहे.

रेल्वे प्रशासनाचे म्हणणे काय?

एकावेळी अनेक तिकिटे उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय कार्यालयातून रेल्वे सूचना प्रणाली केंद्राला पाठवला आहे. यूटीएस अँप अद्ययावत करण्याचे काम या माध्यमातून होते. यूटीएस अँप अद्ययावत करण्यासह तिकीटसंख्या वाढवण्याबाबत सकारात्मक चर्चा संबंधित विभागाशी झाली असून लवकरच ही सुविधा देखील सुरू करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in