

धैर्य गजारा/मुंबई :
दुबईहून मुंबईला येत असलेल्या ‘इंडिगो’ विमानाच्या कार्गो होल्ड क्षेत्रात धूर आल्याचे स्पष्ट होताच विमानाचे सोमवारी दुपारी राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळावर तातडीने आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. या विमानातून १९४ प्रवासी आणि कर्मचारी प्रवास करत होते.
सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले असून कोणालाही दुखापत झालेली नाही. ‘इंडिगो’चे ‘६ई-१४५२’ हे एअरबस ए-३२१ विमान पूर्ण आपत्कालीन नियमावलीनुसार राजकोट विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले. विमानाच्या खालील कार्गो विभागात धूर निघत असल्याचे संकेत मिळताच वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला (एटीसी) सतर्क केले. दुपारी २.४५ वाजता अधिकृतपणे पूर्ण आणीबाणी घोषित करण्यात आली. यानंतर स्थानिक प्रशासनाने तातडीने आपत्कालीन यंत्रणा तैनात केली आणि धावपट्टीच्या बाजूने सुरक्षा वाहने उभी केली.
राजकोट विमानतळावर तातडीने ‘मेजर कॉल’ देण्यात आला होता. सुमारे ७० रुग्णवाहिका, परिचारिका, डॉक्टर आणि अग्निशामक दलाच्या गाड्या विमानतळावर सज्ज ठेवण्यात आल्या होत्या, अशी माहिती राजकोटचे जिल्हाधिकारी ओम प्रकाश यांनी दिली.
आणीबाणी जाहीर झाल्यानंतर ४२ मिनिटांनी, म्हणजे दुपारी ३.२७ वाजता विमानाने राजकोटच्या धावपट्टीवर सुरक्षित लँडिंग करण्यात आले. सुरक्षित लँडिंगनंतर तांत्रिक पाहणी आणि अभियांत्रिकी मंजुरीसाठी हे विमान तत्काळ तेथेच थांबवण्यात आले.
‘इंडिगो’ने जारी केलेल्या निवेदनात, प्रवाशांच्या सुरक्षेची ग्वाही देतानाच ही कारवाई खबरदारीचा उपाय म्हणून करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. विमानाचे सुरक्षित लँडिंग झाल्यानंतर सर्व प्रवासी सुरक्षितपणे खाली उतरले असून, पुढील उड्डाणापूर्वी विमानाची तपासणी सुरू असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.
प्रवाशांसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था
प्रवाशांना मुंबईला नेण्यासाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली असून, विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांना मदत केली जात असल्याचे एअरलाइन्सने नमूद केले. दरम्यान, अडकलेल्या प्रवाशांना मुंबईला पाठवण्यासाठी पर्यायी विमानाची सोय केली जात असतानाच, कार्गो होल्डमधील धुराचा इशारा खरोखरच आग लागल्यामुळे मिळाला होता की सेन्सरमधील बिघाडामुळे, याचा तपास हवाई सुरक्षा नियमक आणि विमान देखभाल अभियंत्यांकडून केला जात आहे.