मुंबई : फेमा कायद्याशी संबंधित तपासासाठी उद्योगपती अनिल अंबानी यांची ‘ईडी’ने सोमवारी चौकशी केली.
मुंबईत ‘ईडी’ अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी अनिल अंबानी हजर झाले. ‘फेमा’ कायद्याच्या कथित उल्लंघनप्रकरणी एका तपासासाठी अनिल अंबानी यांची चौकशी करण्यात आली. वेगवेगळ्या कायद्यांतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी अंबानी यांचा जबाब नोंदवण्यात आला.
यापूर्वी येस बँकेचे प्रवर्तक राणा कपूर व अन्य व्यक्तींच्या विरोधात मनी लाँड्रिंगप्रकरणी अनिल अंबानी हे ‘ईडी’समोर हजर झाले आहेत. अनिल अंबानी यांची त्यावेळी ९ तास चौकशी झाली होती. अंबानी यांच्या नऊ समूहांतील कंपन्यांनी येस बँकेकडून १२८०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.
प्राप्तिकर विभागानेही काळा पैसा नियमांतर्गत अनिल अंबानी यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. त्यावेळी दंडही त्यांना ठोठावला होता. दोन स्वीस बँकेच्या खात्यात ठेवलेल्या ८१४ कोटी रुपयांच्या अघोषित पैशावर कर म्हणून ४२० कोटी रुपयांच्या कथित चोरीप्रकरणी अनिल अंबानी यांना नोटीस जारी केली होती. या प्रकरणी अनिल अंबानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता हे प्रकरण न्यायालयात आहे.
अनिल अंबानी हे अनेक वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. त्यांच्या अनेक कंपन्या विकल्या गेल्या असून, तर अनेक कंपन्या विक्रीच्या मार्गावर आहेत. शेअर बाजारात अनिल अंबानी यांच्या अनेक कंपन्यांच्या समभागांची परिस्थिती अत्यंत खराब आहे. या रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स होम फायनान्स, रिलायन्स पॉवर, रिलायन्स इन्फ्रा व रिलायन्स नवल आदी कंपन्या शेअर बाजारात नोंदणीकृत आहेत.