गोवंडीत बालकांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; ६ दिवसांच्या नवजात बालकाची सुटका

गोवंडीच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याने बालकांच्या तस्करीच्या धक्कादायक प्रकरणाचा पर्दाफाश केला असून, अवघ्या ६ दिवसांच्या नवजात बालकाची विक्री करण्याचा प्रयत्न उधळून लावत ५.५ लाख रुपयांना विक्रीची तयारी असलेला सौदा हाणून पाडण्यात यश मिळविले. याप्रकरणी पोलीसांनी आई-वडिलांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे, यामध्ये काही सराईत गुन्हेगारांचाही समावेश आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

अवधुत खराडे/ मुंबई

गोवंडीच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याने बालकांच्या तस्करीच्या धक्कादायक प्रकरणाचा पर्दाफाश केला असून, अवघ्या ६ दिवसांच्या नवजात बालकाची विक्री करण्याचा प्रयत्न उधळून लावत ५.५ लाख रुपयांना विक्रीची तयारी असलेला सौदा हाणून पाडण्यात यश मिळविले. याप्रकरणी पोलीसांनी आई-वडिलांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे, यामध्ये काही सराईत गुन्हेगारांचाही समावेश आहे.

दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ठाणे येथील येऊर गावातील रहिवासी मयुरी लक्ष्मीनारायण वण्णम (२९) हिने दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई झाली. मे २०२५ मध्ये, सामाजिक कार्यकर्ते डॉ. बिनू वर्गीस यांना माहिती मिळाली की, गोवंडीतील शिवाजीनगर भागात ‘समीर’ नावाचा व्यक्ती नवजात बालकांची विक्री करीत आहे.

ही माहिती मयुरीचे पती लक्ष्मीनारायण वण्णम यांना देण्यात आली, ज्यांनी समीरशी संपर्क साधला. समीरने नवजात बाळ विक्रीस उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर मयुरी, लक्ष्मीनारायण आणि डॉ. वर्गीस यांनी समीरसोबत शिवाजीनगर येथील लोटस जंक्शनवर भेट निश्चित केली.

६ ऑगस्ट रोजी, समीरने मयुरीला फोन करून सांगितले की, नवजात बालक विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि किंमत ५.५ लाख रुपये असेल. हे व्यवहार त्याच दिवशी पूर्ण करणे आवश्यक असल्याचे समीरने बजावले. डॉ. वर्गीस यांनी लगेच पोलिसांनी याची माहिती दिली.

पोलिसांनी डॉ. वर्गीस, मयुरी व लक्ष्मीनारायण यांच्या मदतीने लोटस जंक्शनवर सापळा रचला. समीरने नाझरीन उर्फ नाझिमा असलम शेख (३५) हिला बालक देण्यासाठी पाठवले. नाझरीन व तिची आई फातिमा महमूदअली शेख (७२) बालकासह पोहोचल्या. त्यांनी मयुरीला बाळ दिले आणि सोमैया इरफान खान या महिलेने १ ऑगस्ट रोजी एस. एन. हॉस्पिटल, शिवाजीनगर येथे बाळाला जन्म दिल्याची कागदपत्रे दिली.

नाझरीनने ५.५ लाख रुपयांची मागणी करताच पोलिसांनी कारवाई केली आणि दोघींना अटक केली. चौकशीत त्यांनी सांगितले की, बाळ सोमैया खान नावाच्या ओळखीच्या महिलेकडून समीर उर्फ नबील शेख याने विक्रीसाठी दिले होते.

समीर उर्फ नबील रिजवान शेख, हा स्थानिक गुन्हेगार राजा उर्फ काव्याचा नातेवाईक आहे आणि यापूर्वीही अशाच प्रकरणात त्याला अटक झाली होती. बालकाचे आई-वडील, समीर, नाझरीन आणि इतरांनी मिळून ही रक्कम वाटून घेण्याचे ठरवले होते.

  • नाझरीनविरुद्ध याआधीही बालक तस्करीचा गुन्हा गोवंडी पोलीस ठाण्यात नोंदलेला आहे

  • बाळ सुरक्षित असून सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे

  • समीर उर्फ नबील शेख अद्याप फरार

बालकाची विक्री ५.५ लाखांना

समीरने अद्याप न जन्मलेल्या एका बालकासाठी ४ लाख रुपये किंमत सांगितली आणि ५० हजार रुपये आगाऊ रक्कम मागितली. सौदा पुढे सरकावा म्हणून लक्ष्मीनारायणने १० हजार रुपये दिले.

logo
marathi.freepressjournal.in