निकृष्ट दर्जाचे पेढे, मावा विक्रीवर कारवाई करा

गणेशोत्सव समन्वय समितीची आरोग्य विभागाकडे मागणी
निकृष्ट दर्जाचे पेढे, मावा विक्रीवर कारवाई करा

मुंबई : लाडक्या बाप्पाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. गणेशोत्सवात मावा, मिठाई, पेढे भेसळयुक्त विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मावा, मिठाई पेढे विक्री करणाऱ्यांवर नजर ठेवत भेसळयुक्त आढळल्यास कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीने पालिकेचा आरोग्य विभाग व अन्न व औषध प्रशासन विभागाकडे केली आहे. तसेच फळ आणि फुल यांच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यात यावे, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने पालिकेकडे केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वरळी येथील जी दक्षिण विभाग कार्यालयात नुकतीच आगामी गणेशोत्सवावर बैठक पार पडली. यावेळी समन्वय समितीचे सहकार्यवाह अमित कोकाटे, सह खजिनदार गणेश गुप्ता, ललित मोदी आदी उपस्थित होते.

गणेशोत्सव काळात निकृष्ट दर्जाचे पेढे व मावा विक्री केली जात असल्याचे प्रकरणे उघडकीस येतात. या विक्रीवर कारवाई करण्यात यावी. तसेच लालबाग येथून वाहतूक उत्सव कालावधीत बंद केली जाते. ती वाहतूक ना. म. जोशी मार्गावर वळवली जाते. त्यावेळी रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग मध्ये उभ्या असणाऱ्या वाहनांना महापालिकेच्या वाहन तळावर मोफत पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी समन्वय समितीने केली आहे. विभागात असणा-या सिग्नल प्रणालीमुळे उंच मुर्तींचे आगमन आणि विसर्जनास मार्गक्रमण करण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होते. याबद्दल लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, बाप्पाचे आगमन ज्या रस्त्यांवरुन होते त्या ठिकाणच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात यावेत, तसेच झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात यावी, अशी मागणी केल्याचे बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in