धारावीकरांच्या पुनर्वसनासाठी राखीव इमारतींमध्ये घुसखोरी

शिवशाही पुनर्वसन प्रकल्पामार्फत धारावीतील शेड कॉम्पलेक्समध्ये चार इमारती उभारण्यात आल्या आहेत. या इमारतींच्या तळमजल्यावरील खोल्यामंध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी झाली आहे.
धारावीकरांच्या पुनर्वसनासाठी राखीव इमारतींमध्ये घुसखोरी

मुंबई : शिवशाही पुनर्वसन प्रकल्पामार्फत धारावीतील शेड कॉम्पलेक्समध्ये चार इमारती उभारण्यात आल्या आहेत. या इमारतींच्या तळमजल्यावरील खोल्यामंध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी झाली आहे. याबाबत शिवशाही कंपनीचे अधिकारी अंधारात असल्याने धारावी पुनर्विकास प्रकल्पातील नागरिकांना संक्रमण शिबिर उपलब्ध करून देण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.

धारावीतील अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी सरकारने धारावी पुनर्विकास कंपनीला मुंबईतील मुलुंड, कुर्ला, मिठागरे या जमिनी दिल्या आहेत. कंपनीने महापालिका, म्हाडा, एमएमआरडीए, एसआरए, शिवशाही प्रकल्प यांच्याकडे आणखी घरे मिळावीत म्हणून मागणी केली आहे. असे असतानाच शिवशाही पुनर्वसन प्रकल्प कंपनीने धारावी पोलीस ठाणाच्या मागील शेड कॉम्लेक्समध्ये चार इमारती उभारल्या असून, त्यामध्ये ४२१ सदनिका आहेत. कंपनीने या इमारती धारावी प्रकल्पासाठी राखीव ठेवल्या आहेत; मात्र या इमारतींच्या तळ मजल्यावरील खोल्यांमध्ये घुसखोरी झाली असल्याचे समोर आले आहे.

१२ वर्षांपासून पुनर्विकास प्रकल्पासाठी राखीव

या इमारती गेल्या १२ वर्षांपासून धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या; मात्र आता धारावी पुनर्विकास प्रकल्पाने गती घेतली असल्याने रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. या इमारतींच्या देखभाल-दुरुस्तीवर अंदाजे एक कोटी खर्च शिवशाहीकडून करण्यात आला असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

घुसखोरांवर कारवाई होणार

याबाबत शिवशाही पुनर्वसन प्रकल्पातील समाज विकास अधिकारी प्रकाश मोटकटे यांनी सांगितले की, याबाबत सध्या मला काही माहिती नाही. सदर ठिकाणी भेट देऊन पाहणी केली जाईल. पाहणीमध्ये येथे घुसखोरी झाल्याचे स्पष्ट झाल्यास कारवाई करण्यात येईल.

logo
marathi.freepressjournal.in