कोरोनाच्या चौथ्या लाटेचा शिरकाव

कोरोनाच्या चौथ्या लाटेचा शिरकाव

दोन वर्षांनंतर मुलांनी शाळा गजबजणार असे शुभसंकेत मिळत असताना कोरोनाच्या चौथ्या लाटेने मुंबईत शिरकाव केला आहे. सोमवार, १३ जूनपासून मुंबईतील शाळा सुरू झाल्या, तर कोरोनाचे नियम पाळत विद्यार्थ्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेतली जाईल, अशी माहिती पालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली.मार्च २०२०मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्यानंतर शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आल्यानंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला; मात्र दुसऱ्या व तिसऱ्या लाटेमुळे शाळा पुन्हा बंद करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. आता चौथ्या लाटेने शिरकाव केला असला तरी कोरोनाचे नियम पाळत शाळा सुरू करण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली आहे.

महापालिका शाळांत येणाऱ्या विद्यार्थी, शिक्षकांसह अन्य कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत पालिकेच्या ५०० शालेय इमारतींचे सॅनिटायझेशन पुढील सहा दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच शाळेच्या गेटवर थर्मल स्क्रिनिंग करण्यात येणार असून, प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत मास्क देण्यात येणार असल्याचे कंकाळ यांनी सांगितले. शाळांमध्ये ऑक्सिमीटर, सॅनिटायझरची व्यवस्था, विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पालिकेच्या १,१४७ शाळा असून तीन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एका वर्गात ४० ते ५० विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे हे शिक्षण विभागासमोर मोठे चॅलेंज आहे; परंतु शिक्षण विभागाने याबाबतही योग्य ती दक्षता घेतली असून, प्रत्येक वर्गात सोशल डिस्टन्सिंगचे नियम कशाप्रकारे पाळावेत याबाबत योग्य ती काळजी घेतली जाईल, असे ही कंकाळ म्हणाले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in