मुंबई : रेबीज आजार जीवघेणा असून, रेबीज मुक्त मुंबईसाठी १५ हजार भटक्या कुत्र्यांचे रेबीज लसीकरण करण्यात येणार आहे. रेबीज लसीकरणानंतर क्यू आर कोड असलेले कॉलर घालण्यात येणार असून, क्यू आर कोड स्कॅन करताच भटक्या कुत्र्यांची माहिती उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, रेबीज लसीकरण मोबाईल अॅप आधारित होणार असून, राज्यात प्रथमच मोबाईल अॅप आधारित रेबीज लसीकरण मुंबईत करण्यात येणार आहे. दरम्यान, क्यू आर कोड स्कॅन करताच भटक्या कुत्र्यांची माहिती, त्याला काय खाद्यपदार्थ द्यावे, रेबीज लसीकरण झाले का आदी माहिती उपलब्ध होणार आहे.
२८ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय रेबीज दिवसाचे औचित्य साधून मुंबई महापालिकेच्या वतीने ‘रेबीज मुक्त मुंबई’ हे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यासाठी विविध स्वयंसेवी सस्थांची मदत घेतली जात असून, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई शहर वाहतूक विभाग, बोरिजर इंगलहाईम, पेट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ मुंबई या स्वयंसेवी संस्थेसह इतर १५ स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने २९ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२३ या १० दिवसांच्या कालावधीत पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य, आर उत्तर, एस आणि टी विभागातील जवळपास १५ हजार भटक्या श्वानांचे रेबिज लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी शंभर कर्मचारी कार्यरत असणार आहेत. केवळ लसीकरण न करता भटक्या कुत्र्यांच्या आरोग्यासाठी आता अत्याधुनिक उपाययोजना करण्यात येणार आहेत.
मुंबईमध्ये १ लाख ६४ हजार भटके कुत्रे असल्याचा अंदाज
सन २०१४ मधील सर्वेक्षणानुसार, मुंबईमध्ये सुमारे ९५ हजार भटके कुत्रे होते. सद्यस्थितीत ही संख्या सुमारे १ लाख ६४ हजारांवर पोहोचल्याचा अंदाज आहे. या भटक्या श्वानांना रेबीज या रोगाची लागण होऊ नये तसेच त्यापासून नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी त्यांना रेबीज प्रतिबंधक लस देणे गरजेचे असते. महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निर्देशानुसार उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे यांच्या मार्गदर्शनात भटक्या श्वानांच्या लसीकरणाचा उपक्रम आधीपासूनच सुरू आहे. दर दहा वर्षांनी श्वान गणना होते. आता जानेवारी २०२४ मध्ये भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण प्रस्तावित आहे. त्या सर्वेक्षणाच्या आधारे फेब्रुवारी २०२४ मध्ये व्यापक स्तरावर रेबीज लसीकरणाची मोहीम प्रस्तावित आहे. या मोहीम अंतर्गत केवळ दहा दिवसांच्या कालावधीत सुमारे १ लाख भटक्या श्वानांना रेबिज प्रतिबंधक लस देण्याचे नियोजन आहे.
'या' स्वयंसेवी संस्थांची मदत
या उपक्रमासाठी, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, द वेलफेयर ऑफ स्ट्रे डॉग्स, मिशन रेबिज, वर्ल्ड वाइल्ड वेटरनरी सर्विस, बाई सक्करबाई दिनशॉ पेटिट प्राण्यांचे रुग्णालय, अहिंसा, जीवदया अभियान, मुंबई ॲनिमल असोसिएशन, इन डिफेन्स ऑफ ॲनिमल, यूथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ ॲनिमल, उत्कर्षा ग्लोबल फाउंडेशन, ॲनिमल मॅटर्स टू मी, जीव रक्षा अॅनिमल वेलफेअर ट्रस्ट, जेनिस स्मिथ ट्रस्ट, वर्क फॉर केअर ॲनिमल फाउंडेशन आणि युनिव्हर्सल ॲनिमल वेल्फेअर सोसायटी या स्वयंसेवी संस्था निःशुल्क सेवा देत आहेत. तसेच बोरिजर इंगलहाईम ही संस्था मोफत लस पुरवठा करणार आहे.
प्रतिक्रिया
मोबईल ॲपच्या माध्यमातून भटक्या श्वानांची माहिती एकत्रित केली जाणार आहे. स्वयंसेवी संस्थांच्या सहायाने श्वानांचे रेबीज लसीकरण करण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. लसीकरण करण्यात आलेल्या श्वानाचा फोटो, लसीकरण करण्यात आलेले ठिकाण आणि त्याच्या आरोग्याची माहिती या मोबाईल ॲपमध्ये एकत्रित करण्यात येणार आहे. यापुढील काळातही ही मोहीम सुरू राहणार आहे.
- डॉ. कलीम पाशा पठाण, प्रमुख, पशुवैद्यकीय आरोग्य विभाग