
मुंबई : तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊ नये, यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. ड्रग फ्रि मुंबईसाठी विशेष अभियान राबवण्यात येत असून, या अभियानात मुंबई महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. दरम्यान, या अभियानाचा शुभारंभ यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये बुधवारी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाल्यानंतर ते पालिका मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन केसरकर यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास यांच्या सह अन्य उपस्थित होते.
मुंबईत अंमली पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण वाढले असून, तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. आजची तरुण पिढी देशाचे उद्याचे भविष्य आहे. त्यामुळे तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी 'ड्रग फ्री मुंबई' अभियान राबवले जात आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे 'ड्रग फ्री मुंबई' अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला.
मुंबईतील शाळा, कॉलेज मध्ये हे अभियान राबविल्यामुळे मुलांना व्यसनांच्या दुष्परिणामांची माहिती मिळेल ते परावृत्त राहतील व्यसनमुक्ती साठी हे व्यसनमुक्त दुत असून, मुंबईतील ड्रग वर नियंत्रण आणण्यात या विद्यार्थ्यांची मदत होणार असून, हे व्यसनावर नियंत्रण आणणारे सच्चे प्रहरी ठरणार आहेत. हा प्रकल्प व्यसनमुक्ती क्षेत्रात दिशादर्शक प्रकल्प ठरणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले. इतर सरकारी यंत्रणासह यासाठी पालिकाही पुढाकार घेणार आहे.
४५२ शाळांमध्ये राबवले जाणार
मुंबई शहर जिल्ह्यामध्ये 'ड्रग फ्री मुंबई अभियान' ४५२ शाळांमध्ये राबवले जाणार आहे. येणाऱ्या काळात हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात राबवले जाईल. ड्रग फ्री मुंबई अभियानाच्या सदिच्छा व्यक्त करताना बालकांनी व युवकांनी यात आपला सहभाग देऊन देशातील या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी आपले योगदान देऊन आपला देश अधिक सशक्त व समृद्ध करावा, असे आवाहनही केसरकर यांनी केले.