लोकलच्या धडकेतील जखमी श्वानाला जीवदान! पालिकेकडून मुक्या जीवाला जगण्याची उमेद

लोकलच्या धडकेतील जखमी श्वानाला जीवदान! पालिकेकडून मुक्या जीवाला जगण्याची उमेद

कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात रविवारी दोन श्वान लोकलच्या धडकेत गंभीर जखमी झाले. अपघातात जखमींपैकी एका श्वानाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या श्वानाला वेळीच उपचार मिळाल्याने जीवदान मिळाले.
Published on

मुंबई : कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात रविवारी दोन श्वान लोकलच्या धडकेत गंभीर जखमी झाले. अपघातात जखमींपैकी एका श्वानाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या श्वानाला वेळीच उपचार मिळाल्याने जीवदान मिळाले. पालिका, रेल्वे प्रशासन व स्वयंसेवी संस्थेच्या तत्परतेमुळे वेळीच रुग्णालयात दाखल करणे शक्य झाल्याने मुक्या जीवाला जगण्याची उमेद मिळाली.

कुर्ला स्थानक परिसरात रविवारी दोन श्वानांना उपनगरीय रेल्वेने धडक दिल्याने एका श्वानाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या श्वानाला गंभीर दुखापत झाली होती. कुर्ला स्थानकातील उप स्थानक व्यवस्थापक रवी नांदुरकर यांनी पालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाकडे या अपघाताची माहिती दिली. त्यानंतर, पालिकेच्या वतीने मृत अवस्थेतील श्वानाला वाहनातून नेण्यात आले. तर स्थानकात जखमी झालेल्या श्वानाला मदत करण्यासाठी देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलिमपाशा पठाण यांनी तत्काळ वाहन उपलब्ध करून दिले. पालिकेशी संलग्न असलेल्या बाई सकरबाई दिनशॉ पेटिट ट्रस्टच्या स्वयंसेवकांनी स्थानक परिसरात पोहचून ट्रस्टच्या परळ स्थित रुग्णालयात जखमी श्वानाला दाखल केले. श्वानाच्या जीवाला निर्माण झालेला धोका वेळीच वैद्यकीय मदत मिळाल्यानंतर टळला. श्वानाला गरजेच्या वेळी तत्काळ मदत केल्याने रेल्वे प्रशासनाने पालिकेचे आभार मानले आहेत.

श्वानासाठी संबंधित वैद्यकीय उपचारासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संलग्न संस्थांच्या माध्यमातून मदत करण्यात येते.

येथे तक्रार अथवा सूचना करा!

दरम्यान, श्वानांशी संबंधित तक्रारीसाठी ऑनलाईन पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. नागरिकांनी https:// vhd. mcgm. gov. in/ register - grievance या लिंकवर तक्रार अथवा सूचना दाखल करावी , असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in