रेल्वे अपघातात जखमींवर ५०० मीटर परिसरातच उपचार ;३३ स्थानकातील ५८ रुग्णालयांशी सामंजस्य करार -रजनीश गोयल

मध्य रेल्वेच्या हद्दीत अपघातात जखमींवर वेळीच उपचार मिळणे गरजेचे आहे.
रेल्वे अपघातात जखमींवर ५०० मीटर परिसरातच उपचार ;३३ स्थानकातील ५८ रुग्णालयांशी सामंजस्य करार -रजनीश गोयल

मुंबई : रेल्वे हद्दीत प्रवाशाचा अपघात झाला तर आता स्टेशन परिसरातील ५०० मीटर अंतरावर असलेल्या खासगी अथवा सरकारी रुग्णालयात उपचार मिळणार आहेत. रेल्वे अपघातात जखमीला वेळीच उपचार मिळावे आणि त्याचे प्राण वाचावेत, हा मुख्य उद्देश असल्याचे मध्य रेल्वेचे डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर रजनीश गोयल यांनी सांगितले. यासाठी ३३ स्थानकाजवळील ५८ रुग्णालयांशी करार केला असून पुढील ८ ते १० दिवसांत ही सुविधा उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले.

मध्य रेल्वेच्या हद्दीत अपघातात जखमींवर वेळीच उपचार मिळणे गरजेचे आहे. मध्य रेल्वेच्या १७ स्थानकात असलेल्या आपत्कालीन मेडिकल रूममध्ये डॉक्टर, परिचारिका, औषधे या सगळ्या सुविधा एकाच वेळी उपलब्ध होणे शक्य होत नाही. त्यामुळे जखमींवर वेळीच उपचार करणे शक्य व्हावे, यासाठी मध्य रेल्वेच्या स्थानक परिसरातील रुग्णालयाचे सर्वेक्षण करण्यात आले. तसेच रुग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा केली. यावेळी मध्य रेल्वेच्या हद्दीतील ३३ स्थानक परिसरातील ५८ रुग्णालयांनी प्रतिसाद दिला आणि त्यांच्याबरोबर करारही करण्यात आला आहे. पुढील ८ ते १० दिवसांत स्थानक परिसरातील ५०० मीटर अंतरावर असलेल्या रुग्णालयात सुविधा उपलब्ध होईल, असे गोयल यांनी सांगितले.

आणखी २६ स्थानक परिसरात मिळणार उपचार!

मध्य रेल्वेच्या आणखी २६ स्थानक परिसरातील रुग्णालयात सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून त्याचे सर्वेक्षण व रुग्णालय प्रशासनाशी चर्चा सुरु असल्याचे ते म्हणाले.

प्राथमिक उपचाराचा खर्च रेल्वेचा!

रेल्वे अपघातात जखमी झालेल्या रुग्णावर स्थानकातील आपत्कालीन मेडिकल रूममध्ये प्राथमिक उपचार करण्यात येतात, तो खर्च रेल्वे करते. मात्र खासगी अथवा सरकारी रुग्णालयात दाखल केल्यास तेथील उपचाराचा खर्च संबंधित रुग्णाला करावा लागणार आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेणे शक्य नसल्यास, रुग्णाने सांगितल्यास जवळील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात येईल.

- रजनीश गोयल, डीआरएम, मध्य रेल्वे

logo
marathi.freepressjournal.in