मुंबईतील २० उड्डाणपुलांवर बोगनवेलचा बहर; पालिकेच्या उद्यान विभागाचा अभिनव उपक्रम

वाहनधारकास उड्डाणपुलांवरील प्रवास हा प्रसंगी रुक्ष वाटू शकतो. तसेच उन्हाच्या झळादेखील उड्डाणपुलावर अधिक लागतात.
मुंबईतील २० उड्डाणपुलांवर बोगनवेलचा बहर; पालिकेच्या उद्यान विभागाचा अभिनव उपक्रम

मुंबई : पर्यावरणाच्या संवर्धनासह वाहनधारकांना उन्हाच्या झळा बसू नये, यासाठी मुंबईतील २० उड्डाणपुलांवर बोगनवेल बहरणार आहे. उड्डाणपुलांवरील दुभाजकांत तब्बल दोन हजार फुलांच्या कुंड्या ठेवण्यात येणार आहेत.

पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभाग विविध उपक्रम राबवित असते. उद्यान विभागाने नुकतेच २ ते ४ फेब्रुवारी दरम्यान भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात उद्यानविद्या प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनात तब्बल दहा हजार फुलांच्या कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. या प्रदर्शनाला लाखो मुंबईकरांनी भेट दिली. त्यानंतर आता उद्यान विभागाने मुंबईतील २० उड्डाणपुलांची निवड करून तेथे बोगनवेल फुलांच्या २ हजार कुंड्या ठेवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. मुंबईतील प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि नयनरम्य व्हावा यासाठी उद्यान विभागाने सर्वेक्षण करून या २० उड्डाणपुलांची निवड केली आहे. ही निवड करताना तसेच या दुभाजकांत बोगनवेलीची फुलझाडे लावल्यानंतर वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. त्यासाठी ज्या उड्डाणपुलांवरील दुभाजक अधिकाधिक रुंद असतील, अशाच पुलांची निवड केली आहे.

वाहनधारकास उड्डाणपुलांवरील प्रवास हा प्रसंगी रुक्ष वाटू शकतो. तसेच उन्हाच्या झळादेखील उड्डाणपुलावर अधिक लागतात. त्यामुळे उद्यान विभागाने या पुलांवरील दुभाजक पाना-फुलांनी सजविण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून प्रवास सुसह्य होईल. विशेष म्हणजे बोगनवेल कमी पाण्यात वाढते आणि अधिक काळ टवटवीत राहते. त्यामुळे उद्यान विभागाने बोगनवेल पर्यायाची निवड केल्याचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.

या पुलावर बहरणार बोगनवेल!

के पूर्व विभागातील पश्चिम द्रुतगती महामार्ग, आर उत्तर विभागातील जोडरस्ता (लिंक रोड), एच पूर्व विभागातील वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी) कडून वाकोलाकडे जाणारा उड्डाणपूल, एच पश्चिम विभागातील मीलन उड्डाणपूल, ई विभागातील लालबाग उड्डाणपूल, पी उत्तर विभागातील पश्चिम द्रूतगती महामार्ग, पी दक्षिण विभागातील पश्चिम द्रूतगती महामार्ग, आर मध्य विभागातील राष्ट्रीय उद्यान उड्डाणपूल, मागाठाणे उड्डाणपूल, सुधीर फडके उड्डाणपूल, एल विभागातील सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता उड्डाणपूल, एफ उत्तर विभागातील राजयोगिनी ब्रह्मकुमारी ब्रुजिंद्र दादीजी उड्डाणपूल (शीव पूल), नंदलाल डी. मेहता उड्डाणपूल (माटुंगा उड्डाणपूल), नाना जगन्नाथ शंकरशेट उड्डाणपूल (दादर उड्डाणपूल), एम पूर्व विभागातील पूर्व मुक्त मार्ग, एम पूर्व विभागातील गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता उड्डाणपूल, एम पूर्व विभागातील शीव-पनवेल महामार्गावरील उड्डाणपूल, टी विभागातील पूर्व द्रूतगती महामार्गावरील उड्डाणपूल, जी उत्तर विभागातील शीव-वांद्रे जोड रस्ता, जी उत्तर विभागातील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, एन विभागातील पूर्व द्रूतगती महार्गावरील उड्डाणपूल, एम पश्चिम विभागातील पूर्व मुक्त मार्ग, एम पश्चिम विभागातील सुमन नगर जंक्शन ते चंदननगर वाहतूक दिव्यांपर्यंतचा भाग

logo
marathi.freepressjournal.in