महाराष्ट्र शासनातर्फे नाविन्यपूर्ण उपक्रम देशातील पहिले ‘मधाचे गाव’ महाबळेश्वर मध्ये साकारले जाणार

महाराष्ट्र शासनातर्फे नाविन्यपूर्ण उपक्रम देशातील पहिले ‘मधाचे गाव’ महाबळेश्वर मध्ये साकारले जाणार

राज्यात देशातील पहिले ‘मधाचे गाव’ साकारले जाणार आहे. महाराष्ट्र शासनातर्फे हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जाणार असून यासाठी महाबळेश्वरनजीक असलेल्या ‘मांघर’ गावाची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली. ‘मधाचे गाव’ ही राज्य सरकारची एक महत्वपूर्ण संकल्पना असल्याचे सुभाष देसाई यांनी सांगितले.

मधाचे गाव साकारण्यासाठी गावाची निवड करणे हा अत्यंत महत्त्वाचा भाग होता. या गावाची निवड करताना अनेक बाबींची काळजी घेणे आवश्यक होते. गावाची भौगोलिक रचना, गावातील लोकांचे व्यवसाय, या संकल्पनेसाठी आवश्यक असणारी नैसर्गिक साधनसंपत्ती या आणि अशा अनेक बाबींची पूर्तता होणे गरजेचे होते.

राज्यातील अनेक गावांची तपासणी केल्यानंतर मधाचे गाव साकारण्यासाठी महाबळेश्वर येथील मांघर या गावाची निवड करण्यात आली आहे. मांघर हे गाव महाबळेश्वरपासून ८ किलोमीटर अंतरावर डोंगर कड्याखाली वसलेले गाव आहे. गावाच्या भोवताली घनदाट जंगल असून या ठिकाणी वर्षभर सुंदर फुले फुललेली असतात. या प्रकल्पासाठी याच गावाची निवड करण्याचे मुख्य कारण म्हणजे या गावात सामूहिक पद्धतीने मधमाशांचे संगोपन केले जाते. मांघर या गावातील ८० टक्के लोकसंख्या ही मधमाशापालनाचा व्यवसाय करते.

मधाचे गाव या उपक्रमांतर्गत या गावात मधमाशांची संख्या वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. या निमित्ताने महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांना शुद्ध व दर्जेदार मध मिळणार आहे. मधाचे गाव हे निसर्गाचे संरक्षण, संवर्धन करण्याबरोबरच डोंगराळ व जंगली भागात राहणाऱ्या लोकांसाठी कायमस्वरुपी रोजगार निर्माण करणारा प्रकल्प ठरणार आहे. निसर्गातील अन्न साखळीतील महत्त्वाचा घटक म्हणून मधमाशांकडे पाहिले जाते. मधमाशांच्यामुळे पिक उत्पादनात देखील भरघोस वाढ होत आहे.

अशाप्रकारचा देशातील हा पहिलाच प्रकल्प असून राज्यातील इतर जिल्ह्यात देखील हा प्रकल्प राबविला जाणार असल्याची माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in