गोरेगाव आग दुर्घटनेची चौकशी ; ७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश - आयुक्त

डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन
गोरेगाव आग दुर्घटनेची चौकशी ; ७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश - आयुक्त
Published on

मुंबई : गोरेगाव पश्चिम उन्नत नगर येथील जयभवानी इमारतीत लागलेल्या भीषण आगीची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले होते. या घटनेची चौकशी करण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ८ जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. आगीचे कारण, दुर्घटनेला जबाबदार कोण याची चौकशी करत पुढील सात दिवसांत रिपोर्ट सादर करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

गोरेगाव पश्चिम उन्नत नगर येथील एसआरएच्या तळ अधिक सात मजली जयभवानी इमारतीतील पार्किंगमध्ये गुरुवारी ६ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री भीषण आग लागली आणि या दुर्घटनेत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर ५१ जण जखमी झाले. या दुर्घटना स्थळाला भेट देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश मुंबई महापालिका प्रशासनाला दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ८ जणांची समिती स्थापन केली असून, पुढील ७ दिवसांत रिपोर्ट सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

'या' आठ जणांची समिती

-डॉ. सुधाकर शिंदे अतिरिक्त आयुक्त - समिती अध्यक्ष

-विश्वास शंकरवार, उपायुक्त, समिती सचिव

-अजय कुमार भंन्सल, डेप्युटी कमिशनर, मुंबई पोलीस

-रामा मिटकर, उप अभियंता, एसआरए

-राजेश अक्रे, सहाय्यक आयुक्त, पी दक्षिण

-रवींद्र आंबुलगेकर, मुख्य अग्निशमन अधिकारी

-एस बी सतावलेकर, मुख्य चौकशी अधिकारी, पालिका

-राजीव शेठ, उप अभियंता, इमारत परवानगी सेल, म्हाडा

'या' गोष्टींची होणार चौकशी

-आगीचे कारण काय?

-आगीस जबाबदार कोण?

-अग्निशमन यंत्रणा, उपकरणे, कर्मचाऱ्यांचा अभाव

-भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शिफारशी

logo
marathi.freepressjournal.in