

मुंबई : स्वदेशी बनावटीची पाणबुडीविरोधी युद्धनौका ‘आयएनएस माहे’ सोमवारी भारतीय नौदलात दाखल झाली. कोचीन शिपयार्ड लिमिटेडने तयार केलेली ही युद्धनौका ‘माहे-क्लास’ मालिकेतील पहिलीच नौका असून त्यामुळे भारताची सागरी सुरक्षा आणखी मजबूत होणार आहे. शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध घेऊन त्यांना नष्ट करण्याची क्षमता असलेली ही वेगवान नौका ‘आत्मनिर्भर भारत’चे एक महत्त्वपूर्ण प्रतीक आहे.
या युद्धनौकेच्या कमिशनिंग सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहिलेले लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी म्हणाले की, ‘आयएनएस माहे’ ही फक्त एक नौका नाही, तर स्वदेशी तंत्रज्ञान आणि नौदल क्षमतेचा नवा अध्याय आहे. ‘माहे-क्लास’ मालिकेत एकूण आठ युद्धनौका तयार केल्या जात आहेत आणि त्यातील पहिली नौका आज ताफ्यात दाखल झाली आहे.
द्विवेदी यांनी सांगितले की, ‘आयएनएस माहे’ भारताच्या समुद्री युद्धक्षमता, स्वदेशी डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान आणि उत्पादन कौशल्याचा मजबूत पुरावा आहे. नौकेत बसवलेले स्टील, प्रणाली, इलेक्ट्रॉनिक्स आणि शस्त्रसामग्री सर्व भारतीय आहेत. पूर्वी अशा क्षमतेच्या नौका परदेशातून मागवाव्या लागत होत्या, परंतु आता त्या भारतातच डिझाइन आणि तयार केल्या जात आहेत. पुढील ४-५ वर्षांत उर्वरित ७ नौका देखील नौदलात दाखल होणार आहेत.