पीओपीच्या गणेश मूर्तींचा आग्रह?

पीओपीच्या गणेश मूर्तीं पर्यावरणास हानीकारक हे स्पष्ट आहे.
पीओपीच्या गणेश मूर्तींचा आग्रह?

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी शाडूच्या मातीच्या गणेश मूर्ती हा उत्तम पर्याय असला, तरी पीओपीच्या गणेश मूर्ती साकारणाऱ्यांना छुपे राजकीय पाठबळ मिळते, म्हणूनच पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी घालणे सरकारला आजवर शक्य झाले नाही. राजकीय इच्छाशक्ती असली, तरी काहीही शक्य नाही, असे म्हटले जाते. परंतु पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी घालण्यात सरकार कुठे तरी कमी पडते. एकीकडे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा, असे आवाहन राज्य सरकार व मुंबई महापालिकेकडून केले जात असताना पीओपीच्या गणेश मूर्तींचा आग्रह का? यात 'अर्थपूर्ण' राजकारण दडलंय का, अशी शंका उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले जात असले, तरी गणेशोत्सवात याकडे दुर्लक्ष केले जाते. पीओपीच्या गणेश मूर्तींमुळे पर्यावरणाची हानी, समुद्र जीव धोक्यात असे असतानाही पीओपीच्या गणेश मूर्तीं साकारणाऱ्यावर भर का? पीओपीच्या गणेश मूर्तीं पर्यावरणास हानीकारक हे स्पष्ट आहे. सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २००८ मध्ये पीओपी गणेश मूर्तींवर बंदी लागू केली आहे. केंद्र व राज्य सरकारने यावर मार्गदर्शक सूचना जाहीर करा, असे निर्देश ही दिले. त्यानंतर शाडूच्या मातीची मूर्ती कशा प्रकारे बनवावी, विसर्जन कशा प्रकारे करावे, याबाबत केंद्रीय पर्यावरण प्रदूषण मंडळाने २०१० मध्ये नियमावली जाहीर केली. तर २०१२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पुन्हा आदेश देत पीओपी गणेशमूर्तींवर बंदी लागू करा, असे स्पष्ट केले. मात्र पीओपी गणेशमूर्तींवर बंदी घालण्यात राज्य सरकारची उदासीनता, इच्छाशक्तीचा अभाव. यामुळेच शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तीं साकारणारे मुर्तिकार खंत व्यक्त करत आले आहेत. पीओपीच्या गणेश मूर्ती पर्यावरणास हानीकारक आणि शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तीं साकारा, असे सक्त आदेश राज्य सरकारने दिले, तर काहीही शक्य होऊ शकते; मात्र पीओपीच्या गणेश मूर्तीं साकारणाऱ्यांना छुपे राजकीय पाठबळ मिळत असल्याने पीओपीच्या गणेश मूर्तीं साकारणाऱ्यांची चलती आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

मुंबईतील पर्यावरण बदलास अनेक कारणे असू शकतात. त्यापैकी प्लास्टर ऑफ पॅरिस हे एक. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे पर्यावरणाला धोका, समुद्र जीवाला धोका अशी ओरड पर्यावरणप्रेमींकडून नेहमीच होत असते. मुंबईत १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तर दोन लाखांहून अधिक घराघरात बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात येते. पर्यावरणाच्या रक्षणासाठी शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तीं हा पर्याय समोर आला. शाडूच्या मातीच्या मूर्ती साकारण्यात वेळ लागत असला, तरी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शाडूच्या मातीच्या मूर्तींना पसंती देणे गरजेचे आहे. पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी, असे सक्त आदेश पालिका प्रशासनाने देताच मुंबई महापालिका प्रशासनाने अंमलबजावणीला सुरुवात केली; मात्र पुन्हा एकदा राजकीय हस्तक्षेप आणि पीओपीच्या गणेश मूर्तींवर टप्याटप्याने बंदी घालण्यात येईल, असे पालिका प्रशासनाला स्पष्ट करणे भाग पडले असावे. परंतु शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तीं साकारणाऱ्यांना यंदा पालिका प्रशासनाने पाठबळ दिले आणि शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तीं साकारणाऱ्यांना ४६ ठिकाणी जागा व ४५० मेट्रिक टन माती उपलब्ध केली, तर पुढील वर्षी एक हजार मेट्रिक टन शाडूची माती उपलब्ध करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे पुढील वर्षांपासून पीओपीच्या गणेश मूर्तीं ऐवजी शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तीं अधिक असतील, असा विश्वास व्यक्त करणे काही चुकीचे नाही.

पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य निर्णय घेणे नेहमीच अपेक्षित असते. पीओपीच्या गणेश मूर्तीं पर्यावरणास हानीकारक तर आतापर्यंत बंदी घालण्यात सरकारचा वेळकाढूपणा का, पीओपीच्या गणेश मूर्तीं की, शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तीं राज्य सरकारनेही याचा विचार केला असणारच. तरीही पीओपीच्या गणेश मूर्तीं साकारणाऱ्यांना छुपे पाठबळ देणे म्हणजे पर्यावरणाचा रास होण्यास राज्य सरकार कारणीभूत असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मुंबईत दोन लाखांहून अधिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना घराघरात करण्यात येते. मुंबईत ६० ते ७० हजार गणेश मूर्ती साकारल्या जातात. त्यामुळे उर्वरित गणेश मूर्ती आणणार कुठून ? असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तीं हा पर्याय असला, तरी पेण, पनवेल या ठिकाणाहून मुंबईत येणाऱ्या पीओपीच्या गणेश मूर्तीं रोखणे जिकिरीचे असले तरी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कठोर पाऊल उचलणे काळाची गरज आहे.

... तर मुर्तिकार घडतील

पीओपीच्या गणेश मूर्तीं पर्यावरणास हानीकारक आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ही पीओपी गणेशमूर्तींवर बंदी घातली आहे. त्याची राज्य सरकारकडून अंमलबजावणी होत नाही, ही मोठी खंत आहे. मुंबईत मातीच्या गणेश मूर्तीं साकारणारे ३५० मुर्तिकार आहेत. या मुर्तिकारांना अनुकूल वातावरण मिळाले तर त्याच्या कलेच्या शिकवणीतून नवीन मुर्तिकार घडतील.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in