सीएसएमटी स्थानकातील पॉड हॉटेलची ५ जुलैला पाहणी, काय आहे वैशिष्टय ?

पॉड हॉटेलमध्ये मोफत वाय-फाय, लगेज रूम, प्रसाधनगृह, शॉवर रूम, वॉशरूम असणार आहे. तर पॉडच्या आत वैयक्तिक वापरासाठी टीव्ही, लहान लॉकर, आरसा, एअर कंडिशनर.
सीएसएमटी स्थानकातील पॉड हॉटेलची ५ जुलैला पाहणी, काय आहे वैशिष्टय ?
Published on

सीएसएमटी स्थानकातून सर्वसाधारण लोकलसोबत लांब पल्ल्याच्या गाड्या मोठ्या संख्येने ये-जा करतात. या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बऱ्याच वेळेला गाडीची वाट बघण्यासाठी अथवा पुढील नियोजनासाठी थांबायचे असल्यास मोठ्या प्रमाणात गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. यावर उपाययोजना म्हणून पश्चिम रेल्वे पाठोपाठ मध्य रेल्वेवर देखील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात आलिशान पॉड हॉटेल उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. जून अखेरीस हे हॉटेल प्रवाशांच्या सेवेत येणार होते. मात्र काही तांत्रिक कारणास्तव ही सुविधा सुरु करण्यास विलंब होत असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले असून येत्या ५ जुलै रोजी या पॉड हॉटेलची पाहणी मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार असल्याचे देखील अधिकाऱ्यांनी सांगितले. आहे.

कॅप्सूल हॉटेल म्हणून ओळखले जाणारे हे पॉड हॉटेल उपनगरीय रेल्वे मार्गावरील दुसरे हॉटेल असणार आहे. यापूर्वी १७ नोव्हेंबर २०२१ रोजी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी पॉड हॉटेल उघडण्यात आले होते. यानंतर सीएसएमटी रेल्वे स्थानकावर पॉड हॉटेल तयार होत आहे. यामुळे प्रवाशांना काही तासांसाठी थांबण्याची सुविधा उपलब्ध होणार असून प्रवाशांची गैरसोय टळणार आहे. दरम्यान, मेसर्स नम्मा एंटरप्राइजेस कंपनीकडून १० लाख ७ हजार ७८६ रुपयांची लायसन्स फी आकारून पाच वर्षासाठी हे कंत्राट दिले असून त्यात मध्य रेल्वेला ५५ लाख ६८ हजार रुपयांचा महसूल मिळणार आहे. दरम्यान, या हॉटेलमध्ये १२ तासांच्या मुक्कामाकरिता केवळ ५०० रुपये आकारण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.


पॉड हॉटेलची वैशिष्ट्ये

पॉड हॉटेलमध्ये मोफत वाय-फाय, लगेज रूम, प्रसाधनगृह, शॉवर रूम, वॉशरूम असणार आहे. तर पॉडच्या आत वैयक्तिक वापरासाठी टीव्ही, लहान लॉकर, आरसा, एअर कंडिशनर आणि एअर फिल्टर व्हेंट्स, वाचनासाठी दिवे यासारख्या सुविधा असतील. सीएसएमटीच्या लांब पल्ल्याच्या ट्रेन सुटणाऱ्या ठिकाणी १३९.६१ चौरस मीटर जागेवर हे पॉड्स हॉटेल उभारण्यात येत असून जून अखेरपासून सेवेत येणार आहे. येथे सुमारे ५० पॉड्स उभारण्यात येणार असून वारंवार प्रवास करणारे प्रवासी, सिंगल ट्रॅव्हलर्स, कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्हज आणि स्टडी ग्रुपसाठी ही सुविधा फायदेशीर ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in