
तलावांचे सुशोभिकरण करण्याबरोबर तलावांचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला तलाव परिसर आता कांदळवन म्हणून ओळखला जाणार आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहात आयोजित केलेल्या बैठकीत ही घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईतील जुन्या व दुर्लक्षित राहिलेल्या या तलावाचे पुनरुज्जीवन शक्य होणार असून कांदळवनाचेही संरक्षण होणार आहे.
लोखंडवाला परिसरातील जैवविविधतेचा होणारा ऱ्हास लक्षात घेता लोखंडवाला तलाव वाचवा, अशी मोहीम पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि संस्थांकडून समाजमाध्यमांवर सुरू झाली होती. तलाव परिसरात कचऱ्याचे साम्राज्य तसेच घाणीमुळे जैवविविधता धोक्यात आल्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली होती. याबाबत विविध संस्थांचे प्रतिनिधी, मुंबई महापालिका, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भारतीय वन कायदा कलम चार नुसार तलाव आणि आसपासचा परिसर कांदळवन म्हणून घोषित करण्याचे निर्देश पर्यावरणमंत्र्यांनी दिले आहेत.
आरेतील जंगल प्रदेशाचे दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षणाचे कामही लवकरच सुरु होईल, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी आरे वाचवा मोहिमेतील कार्यकर्त्यांना बैठकीत दिली. तसेच मेळघाट जंगल भागातून जाणारा रेल्वे मार्ग वळवण्यात येणार असून नजीकच्या गावांना दळणवळणाची साधने देण्यास व जंगलाला वाचवण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आग्रही आहेत. ठाण्यात घोडबंदर येथील वाहतुकीचा प्रश्न सोडवून बिबट्याचा भ्रमणमार्गाचीही काळजी घेतली जात असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.