भाविक, अधिकारी, कर्मचाऱ्यांना विमा कवच!विसर्जनस्थळी कार्यरत कर्मचारीवर्गाला सुरक्षा देण्याची समन्वय समितीची मागणी

भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वेगवेगळ्या यंत्रणा काळजी घेत असतात
भाविक, अधिकारी, कर्मचाऱ्यांना विमा कवच!विसर्जनस्थळी कार्यरत कर्मचारीवर्गाला सुरक्षा देण्याची समन्वय समितीची मागणी

मुंबई : लाडक्या गणरायाचे आगमन जल्लोषात होते, त्याचप्रमाणे विसर्जनाच्या दिवशी विसर्जनस्थळी भक्त, विविध यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी कार्यरत असतात. परंतु विसर्जनस्थळी नैसर्गिक आपत्ती उद्भवली, घातपात होऊन भक्त, अधिकारी व कर्मचारी यांची जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विसर्जनस्थळी येणारे भाविक, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विमा काढण्यात यावा, अशी मागणी करणारे पत्र मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंग चहल यांना दिल्याचे बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले.

यंदाचा गणेशोत्सव १९ ते २८ सप्टेंबरपर्यंत मुंबई व मुंबई उपनगरात साजरा केला जाणार आहे. मुंबईमधील मोठमोठ्या मंडळांनी विमा काढलेला आहे. परंतु विसर्जन ज्या-ज्या ठिकाणी होते, त्यापैकी गिरगांव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटी अशा ठिकाणी विसर्जनदिनी भाविक प्रचंड प्रमाणात येत असतात. भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वेगवेगळ्या यंत्रणा काळजी घेत असतात.

परंतु नैसर्गिक आपत्ती उद्भवली किंवा घातपात अथवा अन्य कारणास्तव अपघात होऊन जीवितहानी झाली तर भाविकांसाठी विमा कवच असणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक दायित्वाच्या अंतर्गत भाविक व अन्य कार्यरत असणारे अधिकारी, कर्मचारी यांना विमा कवच उपलब्ध करून दिल्यास त्यांची सुरक्षा होईल व त्यांना कामाप्रती प्रोत्साहन मिळेल, असेही दहिबावकर यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in