अजित पवारांविरुद्ध तीव्र संताप ;विद्यार्थी आक्रमक, पीएच.डी.धारकांबद्दलचे वक्तव्य अंगलट

संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळालीच पाहिजे. देशात ज्यांनी पीएच. डी. मिळविली आहे, त्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपमान केला आहे
अजित पवारांविरुद्ध तीव्र संताप ;विद्यार्थी आक्रमक, पीएच.डी.धारकांबद्दलचे वक्तव्य अंगलट

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएच. डी. धारकांबद्दल बोलताना ‘ते काय दिवे लावणार,’ असे वक्तव्य केले होते. या बेजबाबदार वक्तव्याचे राज्यात तीव्र पडसाद उमटले असून, या वक्तव्याचा विद्यार्थ्यांनी तीव्र निषेध केला आहे. एवढेच नव्हे, तर अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री होऊन काय दिवे लावले, असा प्रतिप्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. तर २०२४ च्या निवडणुकीत विद्यार्थीच दिवे लावतील, असा इशाराही देण्यात आला आहे.

सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा दिल्या जातात. त्यात पीएच. डी.साठी फक्त २०० विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती दिली जाते, त्यामुळे ही संख्या वाढवावी, अशी मागणी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी सभागृहात केली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी पीएच. डी.धारकांची संख्या वाढवून काय करणार, पीएच. डी. करून पोरं काय दिवे लावणार, असा प्रश्न उपस्थित केला होता. यावरून विरोधी पक्षांच्या नेत्यांनी अजित पवार यांना लक्ष्य केले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यातून सरकारचा माज दिसून येतो. सरकारने अशी पीएच. डी. धारकांची थट्टा करू नये, असे म्हटले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे सरकार शिक्षणविरोधी असल्याची टीका केली, तर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी नॉन ग्रॅज्युएट उपमुख्यमंत्र्यांकडून दुसरी काय अपेक्षा करणार, असा प्रश्न उपस्थित केला.

यासोबतच राज्यात विद्यार्थीही आक्रमक झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. सरकारने विद्यार्थ्यांना सुविधा देण्याचे काम केले. उलट ते काय दिवे लावतात, असा प्रश्न विचारून संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा अवमान केला आहे, असे म्हणतानाच त्यांनी उपमुख्यमंत्री होऊन काय दिवे लावले, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. राज्यभरातून या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातही याचे पडसाद उमटले. आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच संशोधक विद्यार्थ्यांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर विद्यार्थी तीव्र आंदोलन करून सामूहिक आत्मदहन करतील, असा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला. एवढेच नव्हे, तर आम्ही यांचे २०२४ मध्ये दिवे लावू, असेही विद्यार्थ्यांनी म्हटले.   

हा पीएच. डी.धारकांचा अवमान

संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळालीच पाहिजे. देशात ज्यांनी पीएच. डी. मिळविली आहे, त्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपमान केला आहे, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला असून, त्यांच्या या वक्तव्याचा विद्यार्थ्यांनी तीव्र निषेध केला.

अजित पवारांना सत्तेचा माज-पटोले

पीएचडी करणारे विद्यार्थी काय  दिवे लावणार, या विधानातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सत्तेचा माज चढल्याचे स्पष्ट होते. शिक्षण हा आमचा अधिकार आहे. अजित पवारांचे हे विधान शिक्षण व्यवस्थेच्या विरोधातील आहे, अशी टीका काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केली. भाजप सरकार हुकुमशाही पद्धतीने काम करत आहे. भाजपप्रणित सरकारने मराठा-ओबीसी समाजात वाद उभा केला. मराठा-ओबीसी समाजात दरी निर्माण करण्यातील पापाचे वाटेकरी भाजप सरकारच आहे, असा आरोप पटोले यांनी केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in