६३ वर्षांपूर्वीच्या ‘दूरदर्शन’ची रंजक गाथा

दिल्लीतल्या एकमेव केंद्रापासून सुरुवात झालेल्या दूरदर्शनचा व्याप आता देशभर पसरला आहे.
६३ वर्षांपूर्वीच्या ‘दूरदर्शन’ची रंजक गाथा

विज्ञानाने मनुष्याला एकापेक्षा अधिक आश्चर्यकारक साधने प्रदान केली आहेत. या अद्भुत उपकरणांपैकी एक म्हणजे ‘दूरदर्शन’. दूरदर्शन हे मनोरंजनाबरोबरच आधुनिक युगात माहिती मिळवण्याचे हे एक महत्त्वाचे साधन आहे. पूर्वी त्याचा वापर महानगरांतील श्रीमंत घरांपुरता मर्यादित होता; परंतु आता तो शहर आणि गावातील प्रत्येक घरोघरी पोहोचला आहे. १५ सप्टेंबर, १९५९ रोजी नवी दिल्ली येथील आकाशवाणी भवन येथे तात्पुरत्या उभारलेल्या स्टुडिओतून दूरदर्शवरून पहिले प्रसारण करण्यात आले. पु. ल. देशपांडे हे दूरदर्शनचे पहिले संचालक होते. त्यांनीच टेलिव्हिजनसाठी ‘दूरदर्शन’ असे नाव सुचवले.

दिल्लीतल्या एकमेव केंद्रापासून सुरुवात झालेल्या दूरदर्शनचा व्याप आता देशभर पसरला आहे. दूरदर्शन, भारतीय राष्ट्रीय दूरदर्शन हे जगातील सर्वात मोठे प्रादेशिक जाळे आहे. डीडी -१ ही वाहिनी १०४२ प्रादेशिक ट्रान्समीटर्सपर्यंत याचे जाळे पसरले आहे. देशात ८५ टक्के लोकसंख्येपर्यंत डीडी-१ चे कार्यक्रम पोहेचतात. या व्यतिरिक्त ६५ अतिरिक्त ट्रान्समीटर्स जोडलेले आहेत. भारतीय राष्ट्रीय उपग्रहावर (इन्सॅट) अनेक ट्रान्सपाँडर्स जोडून प्रसारण क्षेत्र वाढविण्यात आले आहे. प्रत्येक राज्यासाठी दूरदर्शनने स्वतंत्र प्रादेशिक वाहिनी दिली. मुंबईत १९७२ मध्ये दूरदर्शन केंद्र सुरू झाले. देशात ४९ शहरांमध्ये दूरदर्शनचे कार्यक्रम निर्मिती केंद्र कार्यरत आहेत. १९८२च्या आशियाई स्पर्धेतील सामन्याच्या वेळी भारतात दूरदर्शनचे प्रसारण रंगीत असावे, असे सरकारला वाटले. त्यामुळे पंतप्रधान इंदिरा गांधींनी ही कामगिरी भटकर यांच्यावर सोपविली. १९८२मध्ये भारतात झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने रंगीत झालेल्या टीव्हीचं प्रेम पुढे झपाट्याने वाढत गेले. दूरदर्शन हे मनोरंजन आणि ज्ञानाचे उत्तम स्रोत आहे.

आज ती प्रत्येक घराची गरज बनली आहे. उपग्रहाशी संबंधित प्रक्षेपणाच्या सुविधेमुळे, कार्यक्रम त्यावर भरडले गेले आहेत. एकेकाळी केवळ दोन वाहिन्यांपुरते मर्यादित असलेल्या दूरदर्शनकडे आज अनेक वाहिन्या आहेत. १९८५ नंतर घरोघरी दूरचित्रवाणी संच दिसू लागले आणि उंच अँटेना ॲडजेस्ट करीत ‘मुंग्या-मुंग्या’ हा नवा शब्द मराठीला देत मोजक्‍या का होईना, मराठी घरांमधून टीव्ही दिसू लागला. मालिकांविषयीच्या चर्चा रंगू लागल्या. सोसायट्या, चाळी व वस्त्यांमधून अशी ‘टी.व्ही.’धारक घरे सार्वजनिक बनू लागली. यानंतर १९९१ मध्ये ‘स्टार इंडिया’चे पदार्पण झाले.

पुढे १९९२ मध्ये ‘झी’ची हिंदी वाहिनी दिसू लागली आणि या पावलांनी खासगी चॅनेल्सनीदेखील प्रवेश केला. आज दूरदर्शनचे जाळे एवढे पसरले आहे. रिमोट कंट्रोल उचलून आपल्या आवडीनुसार कार्यक्रम बघून आवडते चॅनेल सेट करण्यास उशीर लागत नाही. आज दूरदर्शनवर, चित्रपट, मालिका, बातम्या, गाणी, संगीत, लोकगीते, लोकनृत्य, बोलणे, क्रीडा प्रसारणे, बाजारभाव, हवामानाची परिस्थिती, विविध शैक्षणिक कार्यक्रम आणि हिंदी व्यतिरिक्त अन्य प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारण केली जात आहेत.

एक तासाचा पहिला कार्यक्रम

पु.ल. आणि शिवेंद्र सिन्हा यांनी दूरदर्शनवर एक तासाचा पहिला कार्यक्रम तयार केला होता. त्यात पपेट शो, वैजयंती माला यांचे नृत्य, भेसळ प्रतिबंधात्मक कारवाईची माहिती अशा लोकप्रबोधन आणि मनोरंजन यांचा मिलाफ साधणाऱ्या घटकांचा अंतर्भाव होता. प्रायोगिक तत्त्वावरचे हे प्रक्षेपण आठवड्यात तीन दिवस दिल्ली परिसरातच पाहता येत होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in