मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात देश विदेशातून पर्यटक येतात. या परिसरात येणाऱ्या पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी मुंबई महापालिकेने अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. मरीन ड्राईव्ह परिसरात एक व्ह्युविंग डेक (सी साईड प्लाझा) तयार करणे, आंतरराष्ट्रीय दर्जाचा लेझर शो, सार्वजनिक प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.
या ठिकाणी देण्यात येणाऱ्या सुविधा, स्वच्छता व सुशोभीकरण कामांचा पहाणी दौरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केला. या पाहणी दौऱ्यात महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महिला बालविकास आणि पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालक मंत्री मंगल प्रभात लोढा, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, उपआयुक्त (परिमंडळ १) डॉ. संगीता हसनाळे, ए विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवदास गुरव आदींसह संबंधित सर्व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
मुंबईत जगभरातून पर्यटक येतात. विशेष करून मरीन ड्राईव्ह परिसराला सर्वच पर्यटक हमखास भेट देतात. या पर्यटकांना तसेच या परिसरात विरंगुळा म्हणून भेट देणाऱ्या मुंबईकर नागरिकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निरनिराळ्या सोयी-सुविधा करुन देण्याचे निर्देश शिंदे यांनी यावेळी पालिका प्रशासनाला दिले. मरीन ड्राईव्ह परिसरातील सी फेसिंग इमारतींना विशिष्ट रंग देण्यात यावा. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचा लेझर शो याठिकाणी सुरू करा, असे निर्देश त्यांनी दिले.
मरीन ड्राईव्ह मध्ये पर्यटनाच्या अनुषंगाने एक व्ह्युविंग डेक (सी साईड प्लाझा) तयार करण्यात येत आहे. व्ह्युविंग डेक निर्मिती ही नियोजन विभागाकडून केली जाणार आहे. एकूण ५३ मीटर लांब व ५ मीटर रुंद असा सी साईड प्लाझा नागरिकांना चालण्यासाठी तसेच समुद्र पाहण्यासाठी जेट्टीच्या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे, असे पालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल यांनी सांगितले.
दरम्यान, मरीन ड्राईव्ह परिसरात येणारे नागरिक आणि पर्यटकांच्या सुविधेसाठी प्रत्येक एक किलोमीटर अंतरावर उत्कृष्ट दर्जाचे प्रसाधनगृह उभारण्यात यावे, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यावर, खासगी कंपन्यांच्या सामाजिक दायित्व सहभागाने (सीएसआर) दोन प्रसाधनगृह उभारण्यात येतील, याबाबतचे कार्यादेश लवकरच देण्यात येतील, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांनी दिली.
पर्यटकांना पाहता येणार अथांग समुद्र!
मरीन ड्राईव्ह परिसरात समुद्राच्या दिशेने (सी फेस) आसन व्यवस्था रचना येत्या काही दिवसात करण्यात येईल. त्यामुळे पर्यटकांना समुद्र पाहण्यासाठी चांगली, सुखकर जागा मिळेल. त्यादृष्टीने कामाला सुरुवात करण्यात येत आहे, असेही आयुक्त चहल यांनी स्पष्ट केले.