राजकारणात उतरणार नाही, पण राष्ट्र सर्वोतपरी! ज्येष्ठ अधिकारी समीर वानखेडे यांचे प्रतिपादन

शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर चर्चेत आलेल्या समीर वानखेडे यांच्या ‘नवशक्ति’शी मनमोकळ्या गप्पा
राजकारणात उतरणार नाही, पण राष्ट्र सर्वोतपरी! ज्येष्ठ अधिकारी समीर वानखेडे यांचे प्रतिपादन
Published on

अमली पदार्थांच्या तस्करांचा कर्दनकाळ ठरलेल्या समीर वानखेडे यांचा परिचय देण्याची गरज नाही. २००८च्या तुकडीचे भारतीय महसूल सेवेतील अधिकारी असलेल्या वानखेडे यांनी आपल्या कारवाईने अमली पदार्थांच्या तस्करांना सळो की पळो करून सोडले आहे. शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर ते एकदमच चर्चेत आले. डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे हे राजकारणात उतरणार, अशा जोरदार चर्चा सुरू आहेत. मात्र, वानखेडे यांनी राजकारणात उतरणार नसल्याचे स्पष्ट करतानाच, राष्ट्र हे सर्वोत्तपरी असल्याचे ‘नवशक्ति’शी मनमोकळ्या गप्पा मारताना सांगितले.

लहानपणापासून मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडला गेलो आहे. मी नागपूरला नुकतीच भेट देऊन संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. माजी सरसंघचालक डॉ. हेडगेवार व डॉ. गोळवलकर गुरुजींना श्रद्धांजली अर्पण केली. तेथे जाण्यासाठी मला कोणत्याही परवानगीची गरज नाही. मी काही पाकिस्तानातील दहशतवादी तळाला भेट देत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. संघात जाण्यास माझ्या आईने मला प्रोत्साहन दिले. तेथील शिस्त व शारीरिक कसरतीची सवय मला लागली. माझे वडील ज्ञानदेव वानखेडे हे हिंदू तर माझी आई कै. जहीदा या मुस्लीम होत्या. मी दोन्ही धर्मांचा सन्मान करतो, असे ते म्हणाले.

चेन्नईत कर सेवा विभागाचे संचालक म्हणून काम करणाऱ्या वानखेडे यांनी भाजपमध्ये सामील होण्याच्या मीडियातील बातम्या हसण्यावारी नेल्या. ‘राष्ट्र सर्वतोपरी’ या संकल्पनेवर माझा विश्वास आहे. नागरिक व सनदी अधिकारी म्हणून मी देशाची सेवा करतो. त्यासाठी राजकीय पक्षात जाण्याची गरज नाही. अमली पदार्थविरोधी मोहिमेसाठी मी जास्तीत जास्त वेळ देतो. त्याचबरोबर अनाथ मुलींना चांगले शिक्षण देण्यासाठी माझा प्रयत्न असतो. ही माझ्यासाठी देशाची सेवा आहे. मी कायद्याची पदवी घेतली असून मला प्रॅक्टीसही करता आली असती. मात्र, मी देशसेवा करण्यासाठी नागरी सेवा निवडली, असे त्यांनी सांगितले.

कॉर्डेलिया क्रूझ अमली पदार्थ प्रकरणात वानखेडे यांच्यावर मोठे आरोप झाले. तत्कालिन मंत्री नवाब मलिक यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यावर ते म्हणाले की, मी वैयक्तीक आकसाने कोणावरही कारवाई केली नाही. सर्व काही कायद्याने झाले आहे. काही खटल्यात सेलिब्रिटी असल्याने त्याला प्रसिद्धी मिळते. पण, बॉलीवूडला ‘टार्गेट’ केले नाही. मी अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कारवाई केली. हे अमली पदार्थ समाजासाठी कर्करोग आहेत. कोरोना महासाथीच्या काळात तरुणांची दिशाभूल करण्यात आली, असे त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्रष्टेपणामुळे भारत अधिक मजबूत होत असून तरुणांचे सबलीकरण केले जात आहे. ‘अग्निवीर’ ही चांगली योजना असून तरुणांना प्रशिक्षीत केले जात आहे. त्यातून देशासाठी जबाबदार नागरिक घडवले जात आहेत, असे त्यांनी सांगितले. विक्रम बात्रा, शहीद भगतसिंग हे तरुणांसमोरील आदर्श आहेत. सध्याची युवा पिढी अमली पदार्थांच्या आहारी गेली असून सोशल मीडिया, ओटीटीतून हिंसाचाराला उत्तेजन दिले जात आहे, असे ते म्हणाले.

३५० अमली तस्करांना पकडले

आपल्या कार्यकाळात वानखेडे यांनी ३५० हून अधिक अमली पदार्थ तस्करांना अटक केली आहे. त्यात दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकर, ‘डी’ कंपनीचा साथीदार अरिफ भुजवाला याचा समावेश होता. अमली पदार्थ तस्करांना पकडताना त्यांच्यावर जीवघेणे हल्लेही झाले असून त्यात ते जखमी झाले. ‘डी’ कंपनीकडून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या आहेत, मात्र त्यांनी पोलीस संरक्षण घेणे नाकारले आहे.

वानखेडे यांची धडाकेबाज कामगिरी

गेल्या १५ वर्षांच्या सेवेत वानखेडे यांनी १७ हजार किलो अमली पदार्थ, १६५ किलो सोने जप्त केले. ‘इसिस’च्या आरोपीला भारतात पहिल्यांदा अटक करण्याचे धाडस त्यांनी दाखवले.

logo
marathi.freepressjournal.in