मुंबई : गँगस्टर छोटा राजनचा निकटवर्तीय डी. के. राव याच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी मुंबई गुन्हे शाखा करणार आहे. त्याच्यावर एका हॉटेल खंडणी प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी इतर आरोपींकडून पैसे स्वीकारल्याचा आरोप आहे. तसेच, अटक करण्यात आलेला आरोपी अबूबकर सिद्दीकीच्या मोबाईलमध्ये आढळून आलेले व्हॉट्सअॅप व्हॉईस नोट्स तपासले जात असून डी. के. राव आणि इतर आरोपींचे आवाज नमुने फॉरेन्सिक विश्लेषणासाठी घेतले जाणार आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाला पुष्टी दिली आहे.
गुन्हे शाखेने २३ जानेवारी रोजी डी. के. राव (५३), अबूबकर अब्दुल्ला सिद्दीकी (३७), इमरान कलीम शेख (३१), रियाज कलीम शेख (४०), आसिफ सत्तान खान ऊर्फ सैफ दरबार (३६), जावेद जलालुद्दीन खान (३५) आणि हनीफ इस्माईल नाईक ऊर्फ अण्णू भाई (५३) यांना अटक केली. त्यांच्यावर ७४ वर्षीय हॉटेल व्यावसायिकाकडून २.५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.