मुंबई : अमली पदार्थांच्या खोट्या प्रकरणात खार पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू झाली आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) अधिकराव पोळ यांच्या नेतृत्वाखाली ही चौकशी केली जात असून पोलीस उपायुक्त (डीसीपी) परिमंडळ - ९ यांना पुढील १५ दिवसांत अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
खार येथील एका व्यक्तीच्या खिशात अमली पदार्थ ठेवताना पोलिसांचे चित्रण सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. २० ग्रॅम मेफेड्रोन बाळगल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीला गोवण्याचा या पोलिसाचा प्रयत्न होता.
सहाय्यक पोलीस आयुक्त पोळ यांनी याबाबत सांगितले की, या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे. तूर्त कारवाईबाबत काहीही सांगता येणार नाही. याबाबतचा अहवाल गोपनीय असून तो लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल. याबाबतच्या कार्यवाहीचे अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना आहेत, असेही पोळ म्हणाले.
सहाय्यक निरीक्षक विश्वनाथ अंबुले आणि हवालदार इम्रान शेख, सागर कांबळे आणि शिंदे हे चार पोलीस कालिना मशिदीजवळ शाहबाज खानच्या आवारात प्रवेश करताना एका व्हिडीओमध्ये दिसले होते. पैकी एक पोलीस कर्मचारी ३० वर्षीय डॅनियल एस्बेरोच्या खिशात अंमली पदार्थ ठेवत असल्याचे दिसत होते. ३० ऑगस्टची ही घटना होती. फुटेज सार्वजनिक झाल्यानंतर खार पोलिसांनी डॅनियलची सुटका केली. ३१ ऑगस्ट रोजी पोलिस उपायुक्त यांनी चार पोलिसांना निलंबित केले.
पोलिसांत वारंवार तक्रारी
शाहबाज खान यांनी सांगितले की, मी वाकोला पोलीस स्टेशनला सहा वेळा गेलो. परंतु पोलीस संबंधित चार पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार नोंदवून घेण्यास तयार नव्हते. सहाय्यक पोलीस आयुक्त महेश मुगुतराव यांना मी ही बाब सांगितल्यानंतर त्यांनी मला वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यास सांगितले.