विशाल पवार यांच्या हत्येचा तपास सुरू; गर्दुल्ल्यांच्या हल्ल्यात झाला मृत्यू

सायन-माटुंगा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान गर्दुल्ल्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले पोलीस कॉन्स्टेबल विशाल पवार यांच्या हत्येचा तपास रेल्वे पोलीस, मुंबई पोलीस व गुन्हे अन्वेषण विभागाने सुरू केला आहे
विशाल पवार यांच्या हत्येचा तपास सुरू; गर्दुल्ल्यांच्या हल्ल्यात झाला मृत्यू

मेघा कुचिक/मुंबई : सायन-माटुंगा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान गर्दुल्ल्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले पोलीस कॉन्स्टेबल विशाल पवार यांच्या हत्येचा तपास रेल्वे पोलीस, मुंबई पोलीस व गुन्हे अन्वेषण विभागाने सुरू केला आहे. या हत्येच्या सर्व पैलूंचा व शक्यतांचा विचार सुरू झाला आहे. मुंबईत व रेल्वे स्थानकात गर्दुल्ले बिनधास्तपणे फिरत असून त्याचा धोका आता मुंबईकर व प्रवाशांना बसू शकतो, हेच या प्रकरणातून उघड झाले.

कॉन्स्टेबल विशाल पवार यांना बुधवारी गर्दुल्ल्यांच्या टोळीने व चोरांच्या टोळीने कोंडीत पकडले. त्यांच्या शरीरात इंजेक्शनने विषारी द्रव्य घुसवल्याचा प्रकार उघड झाला. तीन दिवस रुग्णालयात झुंज दिल्यावर त्यांचा मृत्यू झाला.

२८ एप्रिलला रात्रपाळी करण्यासाठी ते रेल्वेने प्रवास करत होते. ते मोबाईलवर बोलत दरवाजावर उभे होते. रात्रौ ९.३० वाजता सायन व माटुंग्या दरम्यान लोकलचा वेग कमी होता. तेव्हा त्यांच्या हातावर कोणीतरी फटका मारला. त्यांच्या हातातील मोबाईल खाली पडला. तो उचलायला ते खाली उतरले. तेव्हा गर्दुल्ल्यांनी त्यांना घेरले. या टोळीतील एकाने त्यांच्या पाठीत विषारी द्रव्य असलेले इंजेक्शन दिले. तसेच त्यांच्या तोंडात लाल द्रव्य टाकले. त्यानंतर ते बेशुद्ध झाले. जवळपास १२ तास ते बेशुद्ध होते. त्यांना काहींनी मदत करून घरी नेले. त्यांच्या कुटुंबीयांनी तात्काळ ठाणे सरकारी रुग्णालयात नेले. त्यांच्या कुटुंबीयांनी कोपरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेथे पवार यांचा जबाब पोलिसांनी नोंदवला. रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, २८ एप्रिल रोजी त्यांच्यावर हा हल्ला झाला. २९ एप्रिलपर्यंत त्यांची प्रकृती चांगली होती. त्यांना पहिल्यांदा सरकारी नंतर खासगी रुग्णालयात दाखल केले. रेल्वे पोलिसांकडे याबाबत १ मे रोजी तक्रार दाखल झाली. पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली.

logo
marathi.freepressjournal.in