अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी पाच जणांची गुन्हे शाखेकडून चौकशी

मॉरिस नोरोन्हा ऊर्फ मॉरिसभाईने आपल्या सहकाऱ्यासोबत अनेकदा विनोद घोसाळकर यांना गोळ्या घालून संपविणार असल्याचे म्हटल्याचे या जबानीतून उघडकीस आले आहे.
अभिषेक घोसाळकर हत्येप्रकरणी पाच जणांची गुन्हे शाखेकडून चौकशी
Published on

मुंबई : शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक विनोद घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेची चौकशी मालिका सुरूच असून, गेल्या दोन दिवसांत पाचजणांची पोलिसांनी चौकशी करून जबानी नोंदवून घेतली आहे. या जबानीतून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना आले आहे.

मॉरिस नोरोन्हा ऊर्फ मॉरिसभाईने आपल्या सहकाऱ्यासोबत अनेकदा विनोद घोसाळकर यांना गोळ्या घालून संपविणार असल्याचे म्हटल्याचे या जबानीतून उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याच्यासोबत या कटात अन्य कोणाचा सहभाग होता का, त्यांनी मॉरिसला हत्येत मदत केली का याचा आता पोलिसांकडून तपास सुरू आहे. तीन दिवसांपूर्वीच मॉरिसने त्याच्याच कार्यालयात आलेल्या अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येनंतर त्याने त्याच पिस्तूलमधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. याच गुन्ह्यांत मॉरिसचा बॉडीगार्ड अमेंदर मिश्रा याला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली असून, तो सध्या पोलीस कोठडीत आहे. अमेंदरच्या परवाना असलेल्या पिस्तूलमधून हा गुन्हा घडल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या अटकेनंतर मॉरिस आणि विनोद घोसाळकर यांच्याशी संबंधित पाच जणांची गेल्या दोन दिवसांपासून गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीचा तपशील समजू शकला नाही; मात्र चौकशीतून हा पूर्वनियोजित कट असल्याचे उघडकीस आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in