जम्बो कोविड घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाण यांची चौकशी

ऑगस्टमध्ये लाईफलाईन हॉस्पीटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या चार भागीदारांच्याविरोधात गुन्हा दाखल केला
जम्बो कोविड घोटाळ्याप्रकरणी सूरज चव्हाण यांची चौकशी

मुंबई : जम्बो कोविड घोटाळयाप्रकरणी युवा सेनेचे सचिव व आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांची आर्थिक गुन्हे शाखेने पाच तास सोमवारी चौकशी केली.

आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही चव्हाण यांचा जबाब नोंदवला असून गरज पडल्यास त्यांना पुन्हा बोलवले जाईल.

आर्थिक गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले की, कोरोना महासाथीच्या काळात जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी चव्हाण यांना चौकशीसाठी बोलवले होते. या प्रकरणाची ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यांच्या घराची झडतीही ‘ईडी’ने केली होती. काळा पैसा गैरव्यवहार प्रकरणी ‘ईडी’ने काही कागदपत्रे जप्त केली होती. ही कागदपत्रे आम्हाला तपासासाठी उपयुक्त ठरतील.

‘ईडी’ने यापूर्वी सुजित पाटकर व डॉ. किशोर बिसुरे यांना दहिसर जम्बो कोविड सेंटरप्रकरणी अटक केली आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये लाईफलाईन हॉस्पीटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या चार भागीदारांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यात सुजित पाटकरचा सहभाग होता. ऑक्टोबर २०२२ मध्ये हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. कोविड सेंटरचे कंत्राट देताना त्यांना आरोग्य व वैद्यकीय सेवेचा कोणताही अनुभव नसल्याचा आरोप पोलिसांमध्ये दाखल केलेल्या तक्रारीत केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in