खिचडी घोटाळ्याप्रकरणी सुरज चव्हाण यांची चौकशी

दुपारी पावणेबारा वाजता त्यांची चौकशी सुरू झाली
खिचडी घोटाळ्याप्रकरणी सुरज चव्हाण यांची चौकशी

मुंबई : कोरोना काळातील कोट्यवधी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू असतानाच खिचडी घोटाळ्यातील एक प्रमुख संशयित व उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाचे सचिव सुरज चव्हाण यांची मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सहा तास कसून चौकशी केली. या चौकशीनंतर त्यांची जबानी नोंदविण्यात आली आहे. चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले. सुरज चव्हाण हे उद्धव ठाकरेच्या शिवसेना गटाचे सचिव असून त्यांच्या चौकशीने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. यापूर्वी कोव्हिड सेंटर कंत्राट घोटाळ्यात त्यांची पोलिसांनी पाच तास चौकशी केली होती. कोरोना काळात मनपाकडून झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा तपास सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडे आहे. याच गुन्ह्यांत गेल्या महिन्यांत सुरज चव्हाण यांची चौकशी करण्यात आली होती. पाच तासांच्या चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर कथित खिचडी घोटाळ्याचा आरोप ठेवण्यात आला होता. कोरोना काळात स्थालांतरीत परप्रांतियांना तांदूळ आणि मसूरची खिचडी तयार करुन त्याचे वाटप करण्यात आले होते. त्यसाठी महागनरपालिकेकडून कंत्राट देण्यात आले होते. त्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झाला होता. याबाबत आरोप होताच आर्थिक गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला होता. तपास हाती येताच पोलिसांनी संबंधित कंत्राटाचे काही दस्तावेज ताब्यात घेतले होते. या दस्तावेजच्या आधारे सुरज चव्हाण यांचे नाव समोर आले होते. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले होते. पोलिसांकडून चौकशीसाठी राहण्याचे समन्स मिळताच सुरज चव्हाण हे पोलीस मुख्यालयातील आर्थिक शाखेत हजर झाले होते. दुपारी पावणेबारा वाजता त्यांची चौकशी सुरू झाली. त्यानंतर तब्बल सहा तासांच्या चौकशीनंतर त्यांची जबानी नोंदवून त्यांना सोडून देण्यात आले. सुरज चव्हाण हे उद्धव ठाकरेच्या शिवसेना गटाचे सचिव असून, त्यांच्या चौकशीने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in