मुंबई : इस्त्रायल इराण युद्धाचा फटका मुंबई विमानतळावरील उड्डाणांना बसला आहे. मध्य पूर्वेतील तणावपूर्ण वातावरणामुळे एअर इंडिया, अकासा एअर आणि इंडिगोसह अनेक विमान कंपन्यांनी उड्डाणे रद्द केली आहेत.
इराण-इस्त्रायल युद्धामुळे जगभरातील हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मध्य पूर्वेतील इस्त्राइल, अमेरिका आणि इराण यांच्यात भडकलेल्या युद्धजन्य संघर्षाचा मोठा फटका मुंबई विमानतळावरील वाहतुकीला बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, युद्धामुळे मुंबई विमानतळावरील ३५० विमाने रद्द करण्यात आली. विमानांची वाहतूक कोलमडल्याने विमानतळांवर हजारो प्रवासी अडकले आहेत. यात विद्यार्थी, खेळाडू, सामान्य नागरिक, पर्यटकांचा समावेश आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर संयुक्त लष्करी कारवाई केल्यानंतर अनेक आखाती देशांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव आपले हवाई क्षेत्र तात्पुरते बंद केले आहे.
मुंबई विमानतळावरून रद्द झालेल्या विमानांपैकी ६७ विमाने उड्डाण करणार होती, तर ५८ विमाने उतरणार होती. त्याचप्रमाणे दिल्ली विमानतळावरून ६० विमानांचे उड्डाण झाले असून ४० विमानांचे लैंडिंग रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावरून एअर इंडियाची मुंबईहून लंडन, न्यूयॉर्क, शिकागो, टोरंटो, फ्रैंकफर्ट आणि पॅरिसला जाणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. इंडिगोनेही अनेक उड्डाणे रद्द केली आहेत. ज्यामध्ये पश्चिम आशियातील उड्डाणांचा समावेश आहे. मुंबई लंडन सेवा विस्कळीत झाली आहे. दिल्ली, मुंबई आणि अमृतसर तसेच लंडन, न्यूयॉर्क, नेवार्क, शिकागो (व्हिएन्ना मार्गे), टोरोंटो (व्हिएन्ना मार्गे), फ्रैंकफर्ट आणि पॅरिस दरम्यानची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अकासा एअरलाइन्सने घोषणा केली आहे की, अबूधाबी, दोहा, जेद्दाह, कुवेत आणि रियाधला जाणारी आणि येणारी सर्व उड्डाणे २ मार्च सोमवारपर्यंत रद्द करण्यात आली आहेत.
४४४ उड्डाणे प्रभावित
एअर इंडिया एक्सप्रेसने त्यांच्या पश्चिमेकडील आंतरराष्ट्रीय उड्डाणे २ मार्च - सोमवारपर्यंत रद्द केली आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, हवाई निर्बंधांमुळे अंदाजे ४४४ उड्डाणे प्रभावित झाल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि मदत सुनिश्चित करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) विमान कंपन्यांसोबत काम करत आहे. या संकटाचा परिणाम केवळ भारतातच नाही तर जगभरात जाणवत आहे.