दोन वर्षात रस्त्यांचे काँक्रिटीकरण अशक्यच मुंबईत ७८७ रस्तेकामांचा पत्ताच नाही; कंत्राटदाराची पाठ ९१० रस्तेकामांपैकी १० महिन्यात फक्त १२३ कामे सुरू

८ ठिकाणी वाहतूकमार्गावर खोदकाम सुरू असून लवकरात लवकर काँक्रिटीकरण करण्यात येईल.
दोन वर्षात रस्त्यांचे काँक्रिटीकरण अशक्यच
मुंबईत ७८७ रस्तेकामांचा पत्ताच नाही; कंत्राटदाराची पाठ ९१० रस्तेकामांपैकी १० महिन्यात फक्त १२३ कामे सुरू

मुंबई : मुंबईतील ३९७ किमीचे ९१० रस्ते सिमेंट क्राँकिटचे करण्यासाठी जानेवारी २०२३ मध्ये मुंबई महापालिकेने पाच कंत्राटदारांना कार्यादेश दिले. मात्र ९१० रस्तेकामांपैकी १० महिन्यात फक्त १२३ रस्त्यांची कामे सुरू असून उर्वरित ७८७ सिमेंट क्राँकिटच्या रस्तेकामाला सुरुवातही झालेली नाही. त्यात शहरातील सिमेंट क्राँकिटचे रस्ते करण्याची कामेच सुरू झालेली नाहीत. त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, डिसेंबर २०२४ पर्यंत मुंबईतील रस्ते सिमेंट क्राँकिटचे करणे अशक्य असल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट क्राँकिटचे रस्ते करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सप्टेंबर २०२२मध्ये मुंबई महापालिकेला दिले.‌ मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर तातडीने निविदा प्रक्रिया राबवण्याचे निर्देश पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी संबंधित विभागाला दिले. रस्ते विभागाने सिमेंट क्राँकिटचे रस्ते करण्यासाठी ६ हजार कोटी रुपयांच्या निविदा मागवल्या. या निविदा प्रक्रियेत पाच कंत्राटदार पात्र ठरले आणि ३९७ किमीचे ९१० रस्ते सिमेंट क्राँकिटचे करण्याचे कार्यादेश जानेवारी २०२३मध्ये देण्यात आले. ३९७ किमीचे ९१० रस्ते सिमेंट क्राँकिटचे करण्याची वर्क ऑर्डर मिळताच, पश्चिम उपनगर व पूर्व उपनगरात कामाला सुरुवात झाली. मात्र शहरातील रस्ते सिमेंट क्राँकिटचे करण्याच्या कामास कंत्राटदाराने सुरुवातच केली नसल्याने त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला हरताळ

जानेवारी ते २८ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ९१० रस्त्यापैकी फक्त १२३ रस्त्यांची कामे सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही ७८७ सिमेंट क्राँकिटच्या रस्तेकामांचा पत्ताच नाही. त्यामुळे डिसेंबर २०२४ पर्यंत मुंबईतील रस्ते सिमेंट क्राँकिटचे हे अशक्य असल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, वर्क ऑर्डर देऊन शहरातील रस्ते सिमेंट क्राँकिटचे करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला हरताळ फासल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

पूर्व व पश्चिम उपनगरात ९६ कामे सुरू

पश्चिम उपनगरात एकूण ९६ ठिकाणी कामे सुरू आहेत. त्यातील ८३ ठिकाणी पर्जन्य जलवाहिनीची कामे प्रगतीपथावर असून १३ ठिकाणी वाहतूकमार्गासाठी खोदकाम केले आहे. त्यामुळे लवकरच सिमेंट क्राँकिटचे रस्ते होतील, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पूर्व उपनगरात २७ कामे सुरु

पूर्व उपनगरात एकूण २७ ठिकाणी कामे सुरू आहेत. त्यातील १९ ठिकाणी पर्जन्य जलवाहिनीची कामे प्रगतीपथावर आहेत. ८ ठिकाणी वाहतूकमार्गावर खोदकाम सुरू असून लवकरात लवकर काँक्रिटीकरण करण्यात येईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in