
यंदाच्या पावसाळ्यापूर्वी मुंबईतील मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरू आहेत; मात्र नालेसफाईच्या प्रत्येक कामाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग व डंपर मध्ये गाळ भरण्याआधी व नंतर फोटो काढून ते सादर करणे कंत्राटदाराला बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, ६ मार्चपासून नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली असून, आतापर्यंत ५ लाख ५८ हजार ८७७ मेट्रिक टन म्हणजे ५६.८९ टक्के गाळ काढण्याचे काम फत्ते झाले आहे. दरम्यान, ३१ मे पूर्वी १०० टक्के गाळ उपसा करण्याचे उद्दीष्ट पूर्ण केली जाईल, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली आहे.
गेल्या वर्षी २१ एप्रिल रोजी नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाल्याने मुंबई महापालिकेला टीकेचा सामना करावा लागला होता. त्यामुळे यंदा सावध भूमिका घेत ६ मार्चपासून नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली आहे.
यंदा ९ लाख ८२ हजार ४२६ मेट्रिक टन गाळ काढण्याचे टार्गेट आहे. यापैकी आतापर्यंत ५ लाख ५८ हजार ८७७ मेट्रिक टन म्हणजे निर्धारित उद्दिष्टाच्या ५६.८९ टक्के गाळ काढण्यात आला आहे.
गाळ काढण्याचे असे होतेय काम!
- शहर विभागातील विविध नाल्यांतून ३७ हजार ९४६ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. पैकी आतापर्यंत २१ हजार ८११ मेट्रिक टन गाळ काढला. हे प्रमाण ५७.४८ टक्के आहे.
- पूर्व उपनगरातील विविध नाल्यातून १ लाख १७ हजार ६९२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. पैकी आतापर्यंत ८० हजार ३५६ मेट्रिक टन गाळ काढला असून हे प्रमाण ६८.२८ टक्के आहे.
- पश्चिम उपनगरातील विविध नाल्यातून १ लाख ९३ हजार ९३३ मेट्रिक टन गाळ काढला जाणार आहे. पैकी आतापर्यंत १ लाख २३ हजार ४०१ मेट्रिक टन गाळ काढला असून, हे प्रमाण ६३.६३ टक्के आहे.
मिठीचा ४२.४८ टक्के गाळ उपसा!
मिठी नदीतून २ लाख १६ हजार १७४ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट केले आहे. पैकी, आतापर्यंत ९१ हजार ८३२ मेट्रिक टन गाळ काढला आहे. हे प्रमाण ४२.४८ टक्के आहे.
लहान नाल्यातील गाळ उपसा
- लहान नाले मिळून ३ लाख ६८ हजार १७७ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. पैकी आतापर्यंत २ लाख १८ हजार ५९८ मेट्रिक टन गाळ काढला आहे. हे प्रमाण ५९.३७ टक्के आहे.
- महामार्गांलगतच्या नाल्यांमधून एकूण ४८ हजार ५०२ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे. पैकी आतापर्यंत २२ हजार ८७६ मेट्रिक टन गाळ काढला असून हे प्रमाण ४७.१७ टक्के आहे.