मोठी बातमी! करचुकवेगिरीप्रकरणी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा

प्रदीप शर्मा यांच्या निवास्थानावर छापा टाकण्याबरोबरच आयटी अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशचे माजी खासदार रमेश दुबे त्यांच्या...
मोठी बातमी!  करचुकवेगिरीप्रकरणी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा

मुंबईचे माजी पोलीस अधिकारी, एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर आज (8 फेब्रुवारी) रोजी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. करचुकवेगिरीप्रकरणी मुंबईतील अंधेरी भागात असलेल्या त्यांच्या निवासस्थानाची आयटी अधिकाऱ्यांनी झडती घेतली. एनकाउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदीप शर्मा यांना याआधी मनसुख हिरण हत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती.

प्रदीप शर्मा यांच्या निवास्थानावर छापा टाकण्याबरोबरच आयटी अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशचे माजी खासदार रमेश दुबे त्यांच्या रिअल इस्टेट डेव्हलपर मुलाच्या निवासस्थानाचीही झडती घेतली. रमेश दुबे यांचे पुत्र असलेल्या पप्पू दुबे यांच्या व्यवसायात प्रदीप शर्मा यांनी गुंतवणूक केल्याचा संशय आयकर खात्याला आहे. शर्मा यांच्याशिवाय या व्यवसायात एका आयएएस अधिकाऱ्याचाही समावेश असल्याचे सांगितले जाते. त्यादृष्टीने आयकर खात्याचे अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरी तपास करत आहेत.

कोण आहेत प्रदीप शर्मा?

प्रदीप शर्मा १९८३ मध्ये पोलीस दलात दाखल झाले होते. त्यांची कारकीर्द अतिशय वादग्रस्त राहिली आहे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधांच्या प्रकरणात त्यांना २००८ साली निलंबित करण्यात आले होते. अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात प्रदीप शर्मा हे आरोपी आहेत. जिलेटिनने भरलेली एक चारचाकी २५ फेब्रुवारी २०२१ रोजी मुकेश अंबानी यांच्या अँटिलियाजवळ सापडली होती. तर ५ मार्च रोजी या चारचाकीचा मालक असलेल्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत आढळला होता. हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) महाराष्ट्र पोलिसांकडून आपल्या हाती घेतला. तपासाअंती २०२१च्या जून महिन्यात प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाजेचाही हात असल्याचे समोर आले होते. याच प्रकरणात काही काळ शर्मा यांनी तुरुंगवास भोगला. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट २०२३ मध्ये त्यांना जामीन दिला.

logo
marathi.freepressjournal.in