हवाला ऑपरेटरवर प्राप्तिकरचे छापे

हवाला टोळ्या भारताबाहेर ३० हजार कोटी रुपये पाठवत असाव्यात, असा संशय प्राप्तिकर विभागाला आहे. यासाठी त्या क्रिप्टो एक्स्चेंजचा वापर करतात.
हवाला ऑपरेटरवर प्राप्तिकरचे छापे
Published on

क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज व डिजिटल टोकनद्वारे परदेशात पैसे पाठवणाऱ्या हवाला टोळीवर कर चुकवेगिरी केल्याप्रकरणी मुंबई व दिल्ली एनसीआर विभागातील प्राप्तीकर खात्याने छापे मारले. ही हवाला टोळी बेहिशोबी पैसा क्रिप्टो एक्स्चेंजचा वापर करून परदेशात पाठवून त्याचा वापर जाहिरातीसाठी करत असल्याचा संशय आहे.

हवाला व्यवहारांवर प्राप्तिकर विभागामार्फत लक्ष ठेवण्यात येत आहे. गुन्हेगार टोळ्या मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करून क्रिप्टो करन्सीचा वापर करत असल्याचे आढळले. गुन्हेगारी टोळ्या पारंपरिक बँकिंग यंत्रणेला दूर ठेवत असून, बेहिशोबी पैसा भारताबाहेर हवालामार्फत पाठवत आहेत. तसेच क्रिप्टोमार्फत अवैध व्यवहार करून कर चुकवेगिरी केली जाते. हा पैसा सीमेपलीकडे पाठवला जातो, असे प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

३० हजार कोटी परदेशात

हवाला टोळ्या भारताबाहेर ३० हजार कोटी रुपये पाठवत असाव्यात, असा संशय प्राप्तिकर विभागाला आहे. यासाठी त्या क्रिप्टो एक्स्चेंजचा वापर करतात. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सिंगापूरमधील क्रिप्टो एक्स्चेंजमध्ये काळा पैसा क्रिप्टो करन्सीमध्ये रूपांतरित करणाऱ्या एका हवाला ऑपरेटरला अटक केली होती. त्यावेळी कर तपासणीत १०० कोटी रुपयांहून अधिक क्रिप्टो मालमत्ता जप्त करण्यात आली होती. सर्व खासगी क्रिप्टो करन्सीना बंदी घालणारे व केंद्रीय बँकांच्या डिजिटल चलनाबाबत आराखडा तयार करणारे प्रस्तावित विधेयक भारत तयार करणार आहे. सध्या या विधेयकावर संसदीय समितीकडून अभ्यास केला जात आहे. या विधेयकामुळे ब्लॉकचेन तंत्रज्ञानाला व अन्य तंत्रज्ञानाला कायदेशीर चौकट मिळणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in