पवार पिता-पुत्रीचे घूमजाव ‘अजितदादा आमचे नेते’ म्हटलेच नसल्याचा यूटर्न

शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यांबद्दल अजित पवार यांना विचारणा करण्यात आली
पवार पिता-पुत्रीचे घूमजाव ‘अजितदादा आमचे नेते’ म्हटलेच नसल्याचा यूटर्न

मुंबई : अजितदादा आमचे, राष्ट्रवादीचे नेते आहेत, असे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केल्यानंतर त्यांचीच री ओढत शरद पवार यांनीही अजित पवार आमचे नेते आहेत, असे वक्तव्य शुक्रवारी सकाळी कॅमेऱ्यासमोर केले. पण, दुपारी लगेचच त्यांनी घूमजाव करत अजित पवार यांचे परतीचे दोर कापले गेले आहेत, असे सांगितले. सुप्रिया सुळे यांनीही अजित पवार राष्ट्रवादीचे नाहीत तर महाराष्ट्राचे नेते आहेत. असे सांगत यूटर्न घेतला. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असे वक्तव्य केल्याने महाआघाडीत मात्र संशयाचे मळभ आणखी गडद झाले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनीही पवारांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या, ‘‘अजितदादा हे आमचेच नेते आहेत. अजितदादा हे राष्ट्रवादीचेच नेते आहेत.’’ सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या असताना पत्रकारांनी शरद पवारांना बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याबाबत विचारले असता, त्यांनीही ‘‘अजित पवार हे आमचे नेते आहेत. कोणी वेगळा निर्णय घेतला तर पक्षात फूट पडली, असं म्हणायचं काही कारण नाही,’’ असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. पवार पिता-पुत्रीच्या वक्तव्याने अजित पवार गटात चैतन्य सळसळू लागले. अजित पवार गटाच्या एका नेत्यानेही ‘‘आमच्या दैवताने आम्हाला आशीर्वाद दिले, पवार साहेबांना विकासाला साथ द्यावी असं वाटत असेल,’ असं वक्तव्य उत्साहाच्या भरात केले.

पण, अजितदादा गटाचे हे चैतन्य काही काळच टिकले. शरद पवार बारामतीत वक्तव्य करून सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथे पोहोचले आणि तिथल्या पत्रकारांनी पवारांना पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारला. पण, इथे पवारांनी घूमजाव करत ‘‘बारामतीत मी असं बोललोच नाही. सुप्रिया त्यांची धाकटी बहीण आहे. बहीण-भावाच्या नात्यात सहजपणे बोलत असतील तर त्याचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. आज जी भूमिका आमच्या सहकाऱ्यांनी घेतली ते आमचे कुणाचेही नेते नाहीत,’’ असं सांगत शरद पवारांनी अवघ्या सहा तासांमध्ये आपल्याच उत्तराला अव्हेरलं. शरद पवारांनी घूमजाव केल्याने सुप्रिया सुळे तरी आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत का, हे पाहण्यासाठी पत्रकारांनी त्यांना पुण्यामध्ये गाठलं. तेव्हा सुप्रिया सुळेंनी वडिलांची री ओढत ‘‘दादा महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत,’’ असे वक्तव्य करत पत्रकारांना बुचकळ्यात पाडले.

शरद पवार एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी दहिवडीच्या पत्रकार परिषदेत पहाटेच्या शपथविधीचा दाखलाही दिला. ‘‘अजित पवारांनी भाजपशी केलेली हातमिळवणी पुन्हा होणार नाही, अशी ग्वाही दिली होती. पण, त्यांनी तोच कित्ता पुन्हा गिरवल्याने त्यांचे परतीचे दोर कापले आहेत. फूट म्हणजे एखादा मोठा गट फुटला गेला तर त्याला फूट म्हणतात. आमच्यातल्या काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. पहाटे शपथविधी झाला त्यावेळी आम्ही त्यांना संधी दिली. आता परत संधी द्यायची नसते आणि मागायची नसते,’’ असे शरद पवार म्हणाले.

अजित पवारांचे नो कमेंट्स

शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यांबद्दल अजित पवार यांना विचारणा करण्यात आली. यावेळी त्यांनी ‘नो कमेंट्स’ असे म्हणत कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला.

राष्ट्रवादीत फूटच -संजय राऊत

‘‘राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशचे दोन अध्यक्ष आहेत. एक जयंत पाटील आणि दुसरे सुनील तटकरे. ही फूट नाही का, असा सवाल ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी केला आहे. अजित पवार गटाने शरद पवारांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आहे. याला आम्ही फूटच मानतो. लोकांच्याही मनात याबद्दल संभ्रम नाही. राष्ट्रवादीच्या एका गटाने ईडीच्या भीतीने भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. मात्र, शरद पवार कधीच भाजपसोबत जाणार नाहीत. त्यांची ती वैचारिक भूमिका कधीच नव्हती. भाजपचा विचार त्यांना मान्य नाही,’’ असेही राऊत म्हणाले.

शरद पवारांबाबत संभ्रम नाही -नाना पटोले

‘‘शरद पवार हे ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत. अजित पवारांनी त्यांच्याशी घेतलेल्या भेटीनंतर परत यावे, असे अजित पवारांना वाटत असावे. अजित पवारांचे मन वळवण्यात शरद पवार यांनाही यश आले असावे, असेच शरद पवार यांच्या विधानावरून दिसत आहे. त्यामुळे अजित पवार पुन्हा स्वगृही परततील, असे चित्र दिसत आहे,’’ असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. शरद पवार यांच्याबद्दल काँग्रेस पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात कोणताही संभ्रम नाही. उद्धव ठाकरेंची शिवसेना व काँग्रेस पक्ष मजबुतीने शरद पवारांच्या पाठीशी उभे आहेत. भाजपच्या विरोधात जे पक्ष लढण्यासाठी एकत्र येतील त्यांना सोबत घेऊन लढू,’’ असे पटोले म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in