परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाकडे पाठ ; पाच वर्षात फक्त ६६८ जणांचा प्रवेश

माहिती कार्यकर्ते मनोरंजन रॉय यांनी माहिती अधिकारात परदेशी विद्यार्थ्यांची माहिती मागवली होती
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाकडे पाठ ; पाच वर्षात फक्त ६६८ जणांचा प्रवेश
Published on

जागतिक कीर्तिच्या मुंबई विद्यापीठात शिकण्यास परदेशी विद्यार्थी तयार नसल्याचे दिसून आले आहे. गेल्या पाच वर्षात केवळ ६६८ परदेशी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचे माहिती उघड झाली आहे. माहिती कार्यकर्ते मनोरंजन रॉय यांनी माहिती अधिकारात परदेशी विद्यार्थ्यांची माहिती मागवली होती.

वार्षिक सांख्यिकीनुसार, २०१८-१९ मध्ये १६६, २०१९-२० मध्ये १६९, २०२०-२१ मध्ये १०१ तर २०२१-२२ मध्ये ११२ विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठ व त्याच्याशी संलग्न महाविद्यालयात प्रवेश घेतला. २०२२-२३ मध्ये १२० परदेशी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.

आयआयटी, नरसी मोनजीकडे कल

परदेशी विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाकडे पाठ फिरवली तरीही आयआयटी मुंबई, नरसी मोनजी इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्स या शैक्षणिक संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी प्रवेश घेत आहेत.

मुंबई विद्यापीठाशी संबंधित महाविद्यालयांमध्येही प्रवेश घेण्यासाठी परदेशी विद्यार्थ्यांमध्ये क्रेझ नाही. एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्समध्ये २०१८-१९ व २०१९-२० मध्ये २१ टक्के परदेशी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. मात्र, गेल्या दोन वर्षात या महाविद्यालयात परदेशी विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला नाही.

भवन्स, डॉन बास्को कॉलेज, हिंदुजा कॉलेज कांदिवली एज्युकेशन सोसायटी, सेंट ॲँड्रयू कॉलेज ऑफ आर्टस‌् सायन्स व कॉमर्स ही महाविद्यालये परदेशी विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहेत. सेंट झेवीयर कॉलेजमध्ये २०१८-१९ व २०१९-२० मध्ये जास्तीत जास्त परदेशी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. लॉकडाऊनच्या काळात सेंट झेवियर्समध्ये १६ परदेशी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.

किती परदेशी विद्यार्थ्यांनी पदवी घेतली, किती जणांचे शिक्षण अजूनही सुरू आहे, विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या, प्रशासनाच्या, शिक्षकांच्या व व्यवस्थापनाच्या विरोधात तक्रार केली का? असे प्रश्न रॉय यांनी विचारले होते. विद्यापीठाने याबाबतची माहिती उपलब्ध नसल्याचे कळवले.

मुंबई विद्यापीठ हे मोठे विद्यापीठ असून त्याच्याशी ७०० महाविद्यालये संलग्न आहेत. मात्र, मुंबई विद्यापीठात व त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयात परदेशी विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या शिक्षणाचा दर्जा सुधारून तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा करणे गरजेचे आहे, असे माहिती अधिकार कार्यकर्ते मनोरंजन रॉय यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in