संघानेच सामाजिक विषमता पसरवली -नाना पटोले

एका कार्यक्रमात बोलताना देशातील गरिबी, बेरोजगारी आणि वाढती विषमता याबाबत चिंता व्यक्त केली होती
संघानेच सामाजिक विषमता पसरवली -नाना पटोले

केंद्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचे भाजपचे सरकार आल्यापासून देशात महागाई, गरिबी आणि बेरोजगारीची स्थिती चिंताजनक बनलेली आहे. आज राष्ट्रीय स्वसंयेवक संघाला त्याची जाणीव झाली हे विशेष म्हणावे लागेल. परंतु देशात खरी सामाजिक विषमता ही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच परसवली आणि रुजवलेली आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी रविवारी स्वदेशी जागरण मंचाच्या एका कार्यक्रमात बोलताना देशातील गरिबी, बेरोजगारी आणि वाढती विषमता याबाबत चिंता व्यक्त केली होती. यावरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

देशात विषमतेचे बिज रुजवणे, त्याला खतपाणी घालणे आणि ते पसरवण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघच जबाबदार आहे. आज त्यांच्याच विचाराचे सरकार केंद्रात मागील ८ वर्षांपासून आहे आणि संघ विचाराच्या कार्यशैलीत भाजप काम करत आहे. या सरकारच्या काळात गरिबांची संख्या प्रचंड वाढली. देशातील ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य पुरवले जात आहे हे मोदी सरकारच सांगते. डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारच्या काळात विकासदर उच्चांकी होता. तर २४ कोटी जनतेला गरिबी रेषेतून बाहेर काढले होते. पण मोदी सरकारच्या काळात चुकीच्या धोरणांमुळे विकास दर घसरत असून २७ कोटी जनता पुन्हा गरिबी रेषेत गेली, असा आरोप पटोले यांनी केला.

मोदी सरकारच्या काळात नोकऱ्यांची निर्मिती करण्याऐवजी आहे त्या नोकऱ्या संपवण्याचे काम केले गेले. नोकरी मागणाऱ्यांना रोजगारदाते बनवण्यावर भर द्यावा असे संघाचे लोक म्हणत आहेत. पण पकोडे तळणे, रिक्षा चालवणे असे उद्योग करण्याचे सल्ले पंतप्रधान देत असतात. मात्र, यातून कसले रोजगारदाते निर्माण होणार हे आरएसएसने स्पष्ट करावे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खरेच सामाजिक विषमतेची चिंता वाटत असेल तर त्यांनी मोदी सरकारला जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यास भाग पाडावे, केवळ दोन लोकांच्या हिताचे निर्णय घेऊ नयेत, असा टोलाही पटोले यांनी लगावला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in