ITI प्रवेशासाठी मुदतवाढ; ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेता येणार

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने आयटीआयच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. आतापर्यंत झालेल्या प्रवेश प्रक्रियेत इलेक्ट्रिशियन अभ्याक्रमाला विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

मुंबई : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने आयटीआयच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. आतापर्यंत झालेल्या प्रवेश प्रक्रियेत इलेक्ट्रिशियन अभ्याक्रमाला विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे.

राज्यातील खासगी आणि सरकारी अशा एक हजार आयटीआयमध्ये १ लाख ५० हजार ५२ जागा उपलब्ध आहेत. या जागांसाठी २ लाख ५६ हजार ३३८ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. यापैकी २ लाख ७ हजार १५५ विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.

आतापर्यंत राबविण्यात आलेल्या फेऱ्यांनंतरही विविध संस्थांमध्ये २४ हजार ६२८ जागा रिक्त आहेत. त्यातच अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याची इच्छा व्यक्त केल्याने संचालनालयाने विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार प्रवेशाची आणखी एक फेरी सप्टेंबरपासून राबविण्यात येणार आहे. ही फेरी ३० सप्टेंबरपर्यंत चालेल. १२ विद्यार्थ्यांना २० सप्टेंबरपर्यंत नव्याने अर्ज नोंदणी, अर्ज दुरस्ती करता येणार आहे. त्यानंतर २१ सप्टेंबर रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.

इलेक्ट्रिशियन अभ्यासक्रमाकडे कल

आयटीआय प्रवेशासाठी राबविण्यात आलेल्या फेऱ्यांमध्ये १ लाख २५ हजार ८२० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक प्रवेश इलेक्ट्रिशियन या अभ्यासक्रमासाठी झाले आहेत. इलेक्ट्रिशियनसाठी सर्वाधिक म्हणजे २३ हजार ३६३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्या खालोखाल फिटर १५ हजार ४२३ आणि वेल्डर या अभ्यासक्रमांसाठी १२ हजार ९८५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.