
मुंबई : राज्यातील आयटीआयमधील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांना २६ जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. प्रवेशाची प्राथमिक गुणवत्ता यादी ३० जून रोजी जाहीर होईल, तर ९ जुलै रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.
आयटीआयच्या विविध अभ्यासाक्रमांसाठी १५ मे पासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. आतापर्यंत सुमारे १ लाख ४० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदणी अर्ज भरले आहेत. यापैकी १ लाख २५ हजार विद्यार्थ्यांनी शुल्क भरून आपले अर्ज निश्चित केले
आहेत. त्याचप्रमाणे ६८ हजार ५८३ विद्यार्थ्यांनी आयटीआय अभ्यासक्रमांचे पसंतीक्रम भरले आहेत.
यापूर्वी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने केवळ प्रवेश नोंदणी वेळापत्रक जाहीर केले होते. मात्र आता प्रवेश प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना २६ जूनपर्यंत नोंदणीसाठी मुदत देण्यात आली आहे.
प्रवेशाची प्राथमिक गुणवत्ता यादी ३० जून रोजी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध होईल. या यादीवर विद्यार्थ्यांना हरकती नोंदवता येणार आहेत. हरकती नोंदविल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेच्या नियमित चार फेऱ्या आणि त्यानंतर संस्था स्तरावर समुपदेशन प्रवेश फेरी राबविण्यात येणार आहे.
...असे असेल वेळापत्रक
ऑनलाइन अर्जासाठी मुदत - २६ जून, सायंकाळी ५ वाजेपर्यंत
प्रवेश अर्ज निश्चित करणे - २७ जून, सायंकाळी ५ वाजेपर्यंत
पहिल्या फेरीसाठी प्राधान्य सादर करणे - २७ जून, सायंकाळी ५ वाजेपर्यंत
प्राथमिक गुणवत्ता यादी - ३० जून, सकाळी ११ वाजता
गुणवत्ता यादीवरील हरकती नोंदविणे - १ जुलै, सायंकाळी ५ वाजेपर्यंत
अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी - ३ जुलै, सायंकाळी ५ वाजता
पहिली यादी - ९ जुलै, सायंकाळी ५ वाजता
प्रत्यक्षात संस्थांमध्ये प्रवेश - १० ते १५ जुलै, सायंकाळी ५ वाजेपर्यंत
दुसरी प्रवेश फेरी - २३ ते २८ जुलैदरम्यान
तिसरी प्रवेश फेरी - २८ जुलैपासून
चौथी प्रवेश फेरी - ४ ते ८ ऑगस्टदरम्यान
संस्था स्तरावर समुपदेश फेरी - २१ ऑगस्ट