
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने मुंबईतील कबुतरखाने हटवण्याचे निर्देश महापालिकेला दिले. त्यानंतर मुंबई महापालिकेने दादरमधील कबूतरखाना ताडपत्रीने झाकला होता. मात्र, मुंबईतील कबूतरखाने सुरू राहावेत, यासाठी जैन समाज आक्रमक झाला असून या प्रकरणाचे पडसाद अखेर बुधवारी उमटले. जैन समाजाने आक्रमक पवित्रा घेत बुधवारी सकाळी दादर येथील कबूतरखान्यावर घातलेली ताडपत्री हटवली. अनेक महिलांनी कबुतरखान्यात घुसून ताडपत्रीसह बांधण्यात आलेल्या बांबूंची मोडतोड केली. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.
जैन समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही, काही आंदोलकांनी तिथे कबुतरांसाठी धान्य टाकले. जैन समाज आक्रमक झाल्याने घटनास्थळी दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले. पोलिसांनी आक्रमक झालेल्या आंदोलकांची धरपकड सुरू केली. अखेर जैन धर्मगुरुंनी आंदोलकांना शांततेचे आवाहन केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
बुधवारी सकाळी जैन बांधवांनी दादरमधील कबूतरखान्याजवळ मोठी गर्दी केली. यामध्ये महिला आणि तरुणांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. पोलिसांनाही या आंदोलनाची काहीच माहिती नव्हती. ‘मुक्या पक्षांना आम्ही खायला देणारच’, अशी भूमिका जैन समाजाच्या आंदोलकांनी घेतली होती. कबुतरांना खायला दिले नाही आणि त्यांचा मृत्यू झाला तर याला जबाबदार कोण राहणार? असा सवाल आक्रमक आंदोलकांनी केला. त्यानंतर अचानक झालेल्या या राड्याने पोलिसांचीही धावपळ झाली. “एका हत्तीणीसाठी संपूर्ण कोल्हापूर उभे राहू शकते. मात्र कबुतरांसाठी हे प्रशासन काही व्यवस्था नाही करू शकत का? प्रशासनाने बांगड्या घातल्या पाहिजेत,” अशा आक्रमक शब्दात जैन समाजाच्या लोकांनी निषेध व्यक्त केला.
या राड्यानंतर कबुतरखाना परिसरात मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी भेट दिली. “कबुतरखान्यात घडलेला प्रकार चुकीचा असून मुंबईकरांनी शांतता राखावी. कुणीही कायदा हातात घेऊ नये. मी सर्व आंदोलकांशी बोलून माहिती घेत आहे,” असे लोढा यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये कबुतरखान्यांवरून मोठा वाद सुरू आहे. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर दादरमधील कबुतरखान्यावर महापालिकेने कारवाई केली होती. पालिकेने हे ठिकाण ताडपत्रीने झाकत हा कबुतरखाना बंद केला होता, तसेच पक्ष्यांना खाद्य घालण्यासही बंदी करण्यात आली होती. मुंबई महानगरपालिकेने दादर कबुतरखाना ताडपत्रीने झाकून बंद केल्याने जैन समाज नाराज झाला होता. याविरोधात जैन समाजाने मोर्चाही काढला होता. तर राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही दादर कबुतरखाना बंद होऊ नये, यासाठी कंबर कसली होती.
कबुतरखान्याबाबत योग्य तो मार्ग काढू - फडणवीस
जैन समाजाच्या धार्मिक भावना आणि लोकांचे आरोग्य यांची सांगड घालावी लागेल, यासाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. एकीकडे धार्मिक आस्था, लोकभावना आहे आणि दुसरीकडे लोकांचे आरोग्यदेखील आहे. धार्मिक भावना जपण्याच्या दृष्टीने आपल्याला काय करता येईल आणि त्यातून आरोग्याला कुठलाही धोका होणार नाही, असा मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
बाहेरच्या लोकांनी आंदोलन केले - लोढा
मंगलप्रभात लोढा यांनी घटनास्थळी जाऊन पोलीस अधिकारी तसेच ट्रस्टशी संवाद साधला. ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, या आंदोलनात बाहेरचे लोक आले होते. त्यांनी हे सगळे केले आहे, आमचा यात संबंध नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्णयाने जैन समाजाच्या ट्रस्टने समाधान व्यक्त केले होते, तसेच त्यांनी सभादेखील पुढे ढकलली होती, असे लोढा यांनी नंतर सांगितले.
जैन समाजाकडून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन - आयुक्त
जैन समाजाकडून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट मत महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी व्यक्त केले आहे. “संतप्त जमावाने काढलेली ताडपत्री व बांबू पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने पुन्हा लावले आहेत. जे कबुतरखाने बंद आहेत, ते बंदिस्तच राहणार आहेत. मात्र, येथील कबुतरांना दाणापाणी देण्यासाठी एक वेळ निर्धारित करण्यात येईल. त्यामध्ये दादरचा कबुतरखानादेखील आहे. नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही, अशी वेळ ठरविण्यात येईल. तसेच उच्च न्यायालयाचा अवमान होणार नाही, तेही पाहिले जाईल,” असेही त्यांनी सांगितले.