
मुंबई : शांतताप्रिय असलेला जैन समाज कबुतरखान्यांसाठी आक्रमक झाला आहे. कबुतरखाने बंद करण्याच्या निर्णयाविरोधात हा समाज १३ ऑगस्टपासून आंदोलनाचे हत्यार उपसणार आहे. तसेच गरज पडल्यास शस्त्रेही हाती घेऊ आणि कोर्टाच्या आदेशालाही जुमानणार नाही असा इशारा जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी दिला.
जैन समाज हा शांतताप्रिय आहे. शस्त्र उचलणे आमचे काम नाही. पण गरज पडली तर आम्ही धर्मासाठी शस्त्रे पण उचलू. आम्ही भारताचे संविधान मानतो, तसेच कोर्टालाही मानतो. परंतु आमच्या धर्माविरोधात आले तर आम्ही कोर्टालाही मानत नाही, असे निलेशचंद्र विजय म्हणाले. सध्या कबुतरखाने बंद करण्याचा सुरू असलेला प्रकार हा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुरू आहे. आमचे पर्युषण पर्व संपल्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ. आता आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा विजय यांनी दिला.
१३ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आंदोलनात देशभरातली जैन बांधव सहभागी होणार आहे. जीव, दया आमच्या धर्मात आहे. जैन धर्माला का लक्ष्य केले जात आहे? असा सवाल उपस्थित करून देशभरातली १० लाख जैन बांधव येथे उपोषणाला बसतील, असा इशारा निलेशचंद्र विजय यांनी दिला.