
जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता ईडीने जप्त केली होती. या जप्तीवर आता न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे.
कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची काही वर्षांपूर्वी लिलावातून विक्री झाली. सध्या हा कारखाना विक्रीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या खासगी मालकीचा असून सध्या तो ‘जरंडेश्वर शुगर्स’ नावाने चालविला जात आहे. लिलावाच्या वेळी मूल्यांकनापेक्षा कमी रकमेत कारखान्याची विक्री झाल्याचा आरोप कारखान्याच्या संस्थापक अध्यक्षा डॉ शालिनीताई पाटील यांनी केला होता. याप्रकरणी न्यायालयात गेल्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार जरंडेश्वर कारखान्याच्या खरेदी-विक्री व्यवहाराची ‘ईडी’मार्फत चौकशी सुरू करण्यात आली. ईडीने या कारखान्याला सील ठोकून त्याच्याशी संबंधित १२०० कोटींची संपत्ती जप्त केली. अजित पवार यांनी बेनामी पद्धतीने व अत्यंत कमी किंमतीत ‘गुरु कमॉडिटीज’मार्फत या कारखान्यावर कब्जा केल्याचा आरोप आहे.