पोलिसांनीच आपसात लाठीमार केला जरांगे-पाटील यांचा गंभीर आरोप : आंदोलन मोडण्यासाठी अरेरावी

अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या दगडफेक आणि जाळपोळप्रकरणी अटक केलेल्या ऋषिकेश बेदरे याचा शरद पवारांसोबतचा फोटो भाजप आमदार नीतेश राणे यांनी ट्विट केला आहे.
पोलिसांनीच आपसात लाठीमार केला जरांगे-पाटील यांचा गंभीर आरोप : आंदोलन मोडण्यासाठी अरेरावी

मुंबई : शांततेत उपोषण सुरू असताना पोलीस हेल्मेट आणि हातात काठ्या घेऊन आले आणि त्यांनी महिला आणि मुलांवर लाठीचार्ज केला. एवढेच नव्हे तर पोलिसांनीच आपसात एकमेकांवर काठ्या हाणल्या, असा खळबळजनक आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मनोज जरांगे-पाटील यांनी पोलिसांना आमचे आंदोलन काहीही करून मोडून काढायले होते, असा गंभीर आरोप केला आहे. पोलिसांना मला रुग्णालयात न्यायचे होते तर त्यावेळीच का नेले नाही, असा सवालही जरांगे यांनी केला आहे.

जरांगे-पाटील म्हणाले, ‘‘पोलिसांना काहीही करून आंदोलन मोडून काढायचे होते. त्या तयारीनेच ते आले होते. सगळे आंदोलन शांततेत सुरू असताना ७०० ते ८०० पोलीस आले. पोलिसांनी उगाचच काहीतरी प्रकार सुरू केले. कार्यकर्त्यांवर अरेरावी सुरू केली. तरीही कार्यकर्त्यांनी हात जोडल्याचे व्हिडीओ आहेत. त्यानंतर मग धक्काबुक्की सुरू झाली. त्यावेळी मोठी धूळ उठली आणि कुणीच कुणाला दिसत नव्हते. त्याचा फायदा पोलिसांनी घेतला आणि तुफान लाठीचार्ज केला. त्यामध्ये पोलिसांनी पोलिसांनाही लाठ्या मारल्या. त्यावेळी सगळे लोक त्यांच्या हातापाया पडले, पण पोलीस ठरवूनच आले होते. पोलिसांनीच भिंतींच्या विटा काढल्या आणि लोकांवर फेकल्या,’’ असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला आहे.

मनोज जरांगे-पाटील म्हणाले, ‘‘आम्ही जातीयवादी असतो तर प्रकाश आंबेडकर किंवा धनगर समाजाने आम्हाला पाठिंबा दिलाच नसता. जातीयवादी म्हणजे रक्तपात करणे होय, एखाद्या समाजाच्या आरक्षणासाठी बोलणारे जातीयवादी कसे? त्यामुळे सुषमा अंधारेंनी हा विषय जातीयवादाकडे नेऊ नये,’’ असेही जरांगे म्हणाले.

राणेंनी केला बेदरे-पवारांचा फोटो ट्विट

अंतरवाली सराटीमध्ये झालेल्या दगडफेक आणि जाळपोळप्रकरणी अटक केलेल्या ऋषिकेश बेदरे याचा शरद पवारांसोबतचा फोटो भाजप आमदार नीतेश राणे यांनी ट्विट केला आहे. हा फोटो ट्विट करत त्यांनी दगडफेकीच्या मास्टरमाइंडमागे कुणाचा हात आहे, असा शरद पवार यांचे नाव न घेता सवाल केला आहे. राणे यांनी ट्विट केलेल्या फोटोत बेदरे, शरद पवारांसह राजेश टोपेही दिसत आहेत. ‘‘१ सप्टेंबरला अंतरवाली सराटीत पोलिसांवर दगडफेक तर ३ सप्टेंबर रोजी शरद पवारांसोबत भेट झाली. पवार साहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण अशांत करतंय’’ असा सवाल ट्विटद्वारे केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in