आता राज्यभर साखळी उपोषण मराठा आरक्षणप्रश्नी जरांगे-पाटील यांचा सरकारला इशारा

सरकारने १ महिना मागितला आम्ही ४० दिवस दिले
आता राज्यभर साखळी उपोषण मराठा आरक्षणप्रश्नी जरांगे-पाटील यांचा सरकारला इशारा
Hp

जालना : सरकारने २४ तारखेपर्यंत मराठा आरक्षणावर निर्णय घेतला नाही, तर २५ ऑक्टोबरपासून राज्यभर साखळी उपोषण आणि त्यानंतरही निर्णय झाला नाही, तर २८ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी दिला आहे. तसेच आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत त्यांच्या अंतरवाली सराटी या गावात राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आल्याचेही जरांगे यांनी जाहीर केले आहे.

मुंबई, पुणे, सोलापूरचा दौरा करून जालन्यात परतलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी अंतरवाली सराटी येथे मराठा कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर पत्रकार बैठकीत बोलताना जरांगे-पाटील म्हणाले, ‘‘सरकारने दोन दिवसांत निर्णय घ्यावा, अन्यथा २५ तारखेपासून शांततेत सुरू होणारे आंदोलन सरकारला झेपणार नाही. सरकारने आरक्षण घेऊनच गावात यावे. नाहीतर गावात यायचे नाही, असा इशारा देतानाच कुणीही उग्र आंदोलन करू नये, आमचे त्याला समर्थन नाही, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मराठा आंदोलन कार्यकर्त्यांच्या बैठकीत मनोज जरांगे-पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘‘तुमच्या हातात दोन दिवस आहेत, मराठ्यांच्या नादाला लागू नका, असा इशारा सरकारला दिला. “सरकारने ईडब्ल्यूएसचे एक नवीन पिल्लू सकाळी सोडलंय. आम्हाला वेडे समजता का? ईडब्ल्यूएस कोणी मागितलंय? कोणाला फायदा झाला आहे? सांगा एखादं नाव. मग कशाला आकडेमोड करता? तुम्ही गणितशास्त्राचे मास्तर होता का?” असा सवाल करत जरांगे-पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. “सरकार सतत सांगतेय की ईडब्ल्यूएसचा फायदा झाला, पण इतरांनाही आरक्षण आहे. त्याची आकडेमोड केली का? नाही केली. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारने वेळकाढूपणा करू नये. सरकारने १ महिना मागितला आम्ही ४० दिवस दिले, असाही पुनरुच्चार जरांगे-पाटील यांनी केला.

तरुणांनो, आत्महत्या करू नका!

गेल्या दोन दिवसांत राज्यात दोन तरुणांनी आरक्षणासाठी आत्महत्या केल्या आहेत. याबाबत जरांगे-पाटील म्हणाले, ‘‘तरुणांनी आत्महत्या करू नयेत, तुमच्या सर्वांची आम्हाला गरज आहे. आमरण उपोषणात अन्न-पाणी, वैद्यकीय सेवा घेणार नाही, असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे. शांततेचे आंदोलनच आपल्या दारात आरक्षण घेऊन येईल, गरीबांना न्याय देण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी,’’ असे आवाहन जरांगे-पाटील यांनी केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in