फडणवीसांच्या उल्लेखावरून जरांगे भाजपच्या निशाण्यावर ;लोढांनंतर आता आ. नितेश राणेंचा इशारा

एकीकडे छगन भुजबळ यांनी ओबीसी कार्ड काढत ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध केला आहे.
फडणवीसांच्या उल्लेखावरून जरांगे भाजपच्या निशाण्यावर ;लोढांनंतर आता आ. नितेश राणेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी सक्षमपणे लढा देणारे मनोज जरांगे-पाटील यांनी लातूर जिल्हा दौऱ्यात राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. फडणवीस यांनी आधी मनाचा मोठेपणा दाखविला होता, मात्र आता खोड्या करायला सुरुवात केली आहे. त्यांनी आताच शहाणे व्हावे आणि मीच घडवून आणत आहे, हे उघडपणे सांगावे; अन्यथा मी सर्व बाहेर काढेन, असा इशारा जरांगे-पाटील यांनी दिला. ते म्हणाले की, ‘फडणवीस यांच्या ताटात जेवणारी माणसे बरळायला लागली आहेत. परंतु, ओबीसी-मराठा कधीही वेगळे होणार नाहीत. त्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी, जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर टीका करू नये, अन्यथा गाठ या मराठ्याशी आहे, असा इशारा दिला.

मनोज जरांगे-पाटील यांनी शनिवारीही फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. तेव्हा राज्याचे मंत्री तथा भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी फडणवीस यांची कड घेत जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर टीका करू नये, असे म्हटले होते. त्यानंतर जरांगे यांनी लोढांवरही टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी जरांगे यांनी फडणवीसांवर हल्ला चढविताना थेट त्यांनी आताच शहाणे व्हावे, असा इशारा दिला. त्यावरून आता भाजप नेते आक्रमक व्हायला लागले असून, आ. नितेश राणे यांनी थेट जरांगे यांच्यावर हल्लाबोल करत मनोज जरांगे यांची थेट गाठ माझ्याशी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे जरांगे-पाटील पुन्हा भाजप नेत्यांवर तुटून पडण्याची शक्यता आहे.

एकीकडे छगन भुजबळ यांनी ओबीसी कार्ड काढत ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध केला आहे. या मुद्यावरून भुजबळ आक्रमक झाले असून, सातत्याने ते जरांगे यांच्यावर एकेरी भाषेत टीका करताना दिसत आहेत. त्यामुळे भुजबळ यांचा बोलविता धनी फडणवीसच असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगत, जरांगे-पाटील यांनी थेट फडणवीस यांनाच इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी कोणी काहीही बोलले तरी मराठा समाजाला आरक्षण मिळणार म्हणजे मिळणारच. सरकारने याचा विचार करावा, असे ते म्हणाले.

नितेश राणेंचा इशारा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करीत असाल, तर आम्ही ते सहन करणार नाही. तुमच्या डोक्यात कोण विष कालवतंय, कोण भाषण लिहून देत आहे, याची माहिती आम्हाला आहे. यासंबंधीची पुराव्यानिशी यादी काढावी लागेल, असा इशारा आ. नितेश राणे यांनी दिला आहे. फडणवीस यांनी मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले. मराठा समाजासाठी असंख्य योजना जाहीर केल्या. त्यामुळे तुम्ही आरक्षणाबद्दल बोलत राहाल, तर तुमचे स्वागत करू. परंतु फडणवीस यांच्या विरोधात बोललेले सहन करणार नाही, असे राणे म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in