जरांगे यांचे आज पुन्हा शक्तिप्रदर्शन जालन्यात सभा : ८० एकरांवर सभेचे नियोजन

मनोज जरांगे यांनी अजून आरक्षणाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. ते अजून लहान आहेत. वेगवेगळ्या जाती-धर्मांना आरक्षण कसे मिळते
जरांगे यांचे आज पुन्हा शक्तिप्रदर्शन जालन्यात सभा : ८० एकरांवर सभेचे नियोजन

मुंबई : मराठा आरक्षणासाठी खंबीरपणे लढा देणारे मनोज जरांगे-पाटील यांनी आपला आक्रमक बाणा कायम ठेवला असून, सरकारवर दबाव वाढविण्यासाठी त्यांनी राज्यभर दौरा केला. आता ते चौथ्या टप्प्यातील दौरा करणार असून, तत्पूर्वी आज (१ डिसेंबर) दुपारी २ वाजता त्यांची जालन्यात जंगी सभा होणार आहे. आता त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जालना येथील पांजरापोळ मैदानावर ७० ते ८० एकरांवर या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने जरांगे-पाटील पुन्हा एकदा शक्तिप्रदर्शन करीत असून, या माध्यमातून ते सरकारला पुन्हा एकदा इशारा देण्याची शक्यता आहे.

या सभेपूर्वी शहरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीदरम्यान विविध समाजबांधवांकडून मनोज जरांगे-पाटील यांचे स्वागत होणार आहे. या सभेपासूनच ते राज्यव्यापी चौथा दौरा सुरू करणार आहेत. त्यामुळे जालन्यात जरांगे-पाटील यांच्या सभेची मराठा समन्वयकांनी जोरदार तयारी केली आहे. यासाठी त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. या सभेसाठी ७० ते ८० एकरांवरील मैदान सज्ज ठेवण्यात आले असून, या मैदानावर आज (१ डिसेंबर) सभा होणार आहे.

१४० जीसीबीद्वारे

फुलांचा वर्षाव होणार

मनोज जरांगे-पाटील यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली असून, त्यांचे जालन्यात आगमन होताच शहरात ठिकठिकाणी १४० जीसीबीद्वारे त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात येणार आहे. यावेळी १०१ उखळी तोफांचा बार उडविण्यात येणार आहे. सभेच्या दृष्टीने ठिकठिकाणी मोठमोठी होर्डिंग्ज लावण्यात आले असून, सभास्थळी त्यांचा सत्कार करण्यासाठी तब्बल १० क्विंटल फुलांचा १०० फुटी हारही तयार करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचे जालन्यात जंगी स्वागत होणार आहे.

मनोज जरांगे-पाटील यांनी या अगोदर जिल्ह्यातील त्यांचे गाव असलेल्या अंतरवाली सराटी येथे जंगी सभा आयोजित केली होती. त्यावेळी रेकॉर्डब्रेक गर्दी झाली होती. आता जालन्यातील सभेतही रेकॉर्डब्रेक गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या सभेसाठी १० लाखांवर मराठा बांधव हजेरी लावतील, असा दावा आयोजकांनी केला आहे.

जरांगेंनी आरक्षणाचा अभ्यास करावा -राणे

मनोज जरांगे यांनी अजून आरक्षणाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. ते अजून लहान आहेत. वेगवेगळ्या जाती-धर्मांना आरक्षण कसे मिळते, त्यासाठी घटनेत काय तरतुदी आहेत, याचा अभ्यास मनोज जरांगे-पाटील यांनी करावा, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले. ५२ टक्क्यांपुढे भारतीय घटनेनुसार सर्वेक्षण करून एखाद्या समाजाला सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. त्यानुसार मी मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले होते. पण ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यास आपला विरोध आहे. मराठा समाजही ते स्वीकारणार नाही, असे राणे म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in