'मिनी महाबळेश्वर'ला फेब्रुवारीतच उन्हाचा तडाखा; जव्हारमध्ये थंड पेयांची मागणी वाढली

'मिनी महाबळेश्वर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जव्हार शहरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून रविवारी कमाल तापमानाने २६ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला. फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा चटका जाणवू लागल्याने नागरिक हैराण झाले असून दुपारच्या सुमाराला रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसून आले.
'मिनी महाबळेश्वर'ला फेब्रुवारीतच उन्हाचा तडाखा; जव्हारमध्ये थंड पेयांची मागणी वाढली
'मिनी महाबळेश्वर'ला फेब्रुवारीतच उन्हाचा तडाखा; जव्हारमध्ये थंड पेयांची मागणी वाढली
Published on

जव्हार : 'मिनी महाबळेश्वर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जव्हार शहरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून रविवारी कमाल तापमानाने २६ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला. फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा चटका जाणवू लागल्याने नागरिक हैराण झाले असून दुपारच्या सुमाराला रस्त्यांवरील वर्दळ कमी झाल्याचे चित्र दिसून आले.

सकाळी काहीसे आल्हाददायक वातावरण असले तरी दुपारी १२ नंतर उन्हाची तीव्रता वाढत आहे. शिमगा तोंडावर आल्याने उन्हाची तमा न बाळगता नागरिक मुख्य बाजारपेठ, एसटी स्टँड परिसर तसेच विविध ठिकाणी खरेदी, दवाखाना, शाळा, महाविद्यालय, बँक आणि प्रशासकीय कामांसाठी ये-जा करताना दिसत आहेत. मात्र, उन्हाच्या झळांमुळे दुचाकीस्वार आणि पादचारी त्रस्त झाले आहेत. अनेकांनी डोक्यावर रुमाल, टोपी किंवा स्कार्फ बांधूनच प्रवास करण्याचा पर्याय निवडला. थंड पेये, उसाचा रस, लिंबू पाणी आणि आईस्क्रीम विक्रेत्यांकडे ग्राहकांची गर्दी वाढलेली दिसली. काही ठिकाणी शीतपेयांच्या दुकानांपुढे रांगा लागल्याचेही चित्र पाहायला मिळाले. त्याचबरोबर कलिंगड खाण्यासाठीही शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी लोकांनी गर्दी केली होती.

लहान मुले, ज्येष्ठांनी काळजी घ्या !

आरोग्य तज्ज्ञांनी वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांना दुपारच्या कडक उन्हात अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि हलका आहार घ्यावा, असा सल्ला दिला आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यंदाचा उन्हाळा कडकडीत

भारतीय हवामान विभाग यांच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मार्चपूर्वीच उन्हाची तीव्रता वाढत असल्याने यंदा उन्हाळा अधिक कडक राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उन्हामुळे रोजंदारीवर परिणाम दुपारच्या तडाख्यामुळे बांधकाम क्षेत्रातील मजूर, हातगाडीवाले आणि विक्रेते यांना फटका बसत आहे. कामाचा वेग मंदावल्याने रोजंदारीवर परिणाम होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in