लसीचा सीड स्ट्रेन विकण्याचा प्रस्ताव रद्द करा; जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

डीपीटी (घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात) लसीचा सीड स्ट्रेन खासगी कंपनीला विकण्याचा प्रस्ताव तत्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.
लसीचा सीड स्ट्रेन विकण्याचा प्रस्ताव रद्द करा; जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
लसीचा सीड स्ट्रेन विकण्याचा प्रस्ताव रद्द करा; जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Published on

मुंबई : डीपीटी (घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात) लसीचा सीड स्ट्रेन खासगी कंपनीला विकण्याचा प्रस्ताव तत्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.

मुंबईच्या हाफकिन बायो फार्मास्युटिकल कॉर्पोरेशनचे लसीकरणात फार मोठे योगदान आहे. डीपीटी लसीचे उत्पादन करण्याची क्षमता हाफकिनकडे आहे. ही अत्यंत दुर्मिळ जैव संपत्ती असून तिचे बाजारमूल्य हजारो कोटी रुपयांच्या घरात आहे. मात्र रिलायन्स लाइफ सायन्स या खासगी कंपनीने ही सीड स्ट्रेन व्यावसायिक अटींवर विकत घेण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर शासन पातळीवर लगेचच विक्री-प्रक्रिया सुरू झाल्याचे दिसते, याकडे पाटील यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.

एका खासगी कंपनीच्या मागणीवरून अशी मौल्यवान जैव संपत्तीची विक्री प्रक्रिया सुरू होणे हे अत्यंत चिंताजनक आहे. ज्यांच्या नावाने ही संस्था उभी आहे, ते महान शास्त्रज्ञ वाल्देमर हाफकीन यांनी मानवतेच्या सेवेसाठी लसी विकसित केल्या. त्यांनी आपल्या संशोधनावर कोणतेही पेटंट घेतले नाही. कारण वैद्यकीय शोध मानवतेच्या हितासाठी असावेत, हा त्यांचा ठाम विश्वास होता. मात्र शासनाने याचा कोणताही विचार न करता, ही सीड स्ट्रेन विक्रीची प्रक्रिया सुरू करून त्यांच्या सिद्धांतांची थट्टा उडवल्याची टीका जयंत पाटील यांनी पत्रातून केली आहे.

logo
marathi.freepressjournal.in