
जेजुरी गडावरील मंदिराचे जतन आणि संवर्धन याकरिता विकास आराखड्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. श्री क्षेत्र जेजुरी गडतीर्थक्षेत्र मंदिराचे सपोर्ट क्षेत्रफळ १६७ चौरस मीटर असून कोटाचे क्षेत्रफळ १२४० चौ मी.आहे. येथे यात्रा उत्सवाच्या वेळी दर दिवशी सुमारे दीड ते दोन लाख तर वर्षात सुमारे ४० ते ५० लाख भाविक भेट देतात. या गडाचा विकास तीन टप्प्यांत करण्यात येणार असून त्यानुसार जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून रु.३४९.४५ कोटी रकमेचा श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखडा एकूण तीन टप्प्यांमध्ये राबविण्याचे नियोजन तयार करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यात वास्तूचे जतन आणि संवर्धन, पायाभूत सुविधा आणि पर्यटक सोयी सुविधा, जलव्यवस्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये शास्त्रीय पद्धतीने दगडांची स्वच्छता, अनियोजित व हानिकारक जोडण्या काढणे, खराब झालेल्या चुन्याच्या गिलाव्याची डागडुजी, पाणी गळती थांबविण्यासाठी डागडुजी, विद्युत सोयी, पाणी पुरवठा, निचरा व्यवस्था, मल:निसारण आणि त्या पाण्याचा पुनर्वापर, योग्य वायुविजन प्रणाली, मंदिर परिसरातील धूळ गोळा करण्यासाठी यंत्र, घनकचरा व्यवस्थापन, भक्तांसाठी सोयीसुविधा, गर्दीचे व्यवस्थापन, आपत्कालीन व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक योजना आदी कामे करण्यात येणार आहेत.